पालकसचिव राजगोपाल देवरा यांचे निर्देश; जिह्यासाठी 375 कोटींची तरतूद
तिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिह्यासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अर्थसंकल्पीय तरतूद सुमारे 375 कोटी इतकी आहे. जिह्यातील संबंधित विभागांनी शंभर टक्के निधी खर्चाच्या दृष्टीने योग्य नियोजन करावे, असे निर्देश वित्त विभागाचे प्रधान सचिव तथा जिह्याचे पालक सचिव राजगोपाल देवरा यांनी सोमवारी दिले.
जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक राजर्षी शाहू सभागृहात आयोजित केली होती. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मनपा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (जि. प.) अजयकुमार माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी उपस्थित होते.
अनुसूचित जाती उपयोजनेवर आवश्यक निधी खर्च नाही
राजगोपाल देवरा पुढे म्हणाले, आरोग्यविषयक नवी कामे तात्काळ सुरू करावीत. तसेच वैद्यकीय साहित्य खरेदी, आरोग्य केंद्रातील अर्धवट बांधकामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. त्याचबरोबर कंत्राटी कामगारांचे मानधनापोटीचे सात कोटी तसेच औषधे आणि साधनसामुग्रीचे पाच कोटी प्रलंबित आहेत. याचा एकत्रित प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागाने विशेष बाब म्हणून शासन स्तरावर लवकर पाठवावा, अशी सूचना केली. अनुसूचित जाती उपयोजनेवर आवश्यक तेवढा निधी खर्च न झाल्याने खंत व्यक्त केली. या महिनाअखेरपर्यंत तो खर्च करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
कंत्राटी कामगारांचे सात कोटी रुपये देणे प्रलंबित
जिह्यातील सर्व विभागांनी शंभर टक्के निधी खर्चाचे प्रस्ताव पुढील देन आठवड्यात सादर करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी केली. कोविडच्या अनुषंगाने सेवा घेतलेल्या कंत्राटी कामगारांचे सुमारे सात कोटी रुपये देणे प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी साळे यांनी दिली. कोविडच्या अनुषंगाने खर्चासाठी सुमारे 113 कोटी रुपये जिह्याला प्राप्त झाल्याचे नियोजन अधिकारी पवार यांनी सांगितले.
यावेळी आमदार-खासदार, स्थानिक विकास कार्यक्रम तसेच डोंगरी विभाग विकास कार्यक्रमासोबतच कोविडच्या संभाव्य तिसर्या लाटेच्या अनुषंगाने देवरा यांनी सविस्तर आढावा घेतला. बैठकीसाठी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण, शहर अभियंता (मनपा) नेत्रदीप सरनोबत, शिक्षणाधिकारी (प्राथ.) जे. एस. जाधव, विभागीय वनअधिकारी अमित मांजरे, सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, इनुजा शेख, जिल्हा जलसंधारण अधिकारी बी. व्ही. आजगेकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.