दुसरा क्रॉस येथील अर्ध्या रस्त्याकडे मनपाचे दुर्लक्ष : रहिवाशांमधून नाराजी
प्रतिनिधी / बेळगाव
वडगाव आनंदनगर दुसरा क्रॉस येथील रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र सदर रस्त्याचे काम अर्धवट करण्यात येत असून उर्वरित रस्त्याचे काम करण्यासाठी निधी नसल्याचे सांगून काम बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे रहिवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिकेच्यावतीने विविध रस्त्याच्या विकासाची कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र रस्त्याचे काम पूर्ण करण्याऐवजी निधी संपल्याचे कारण देऊन रस्त्याचे काम अर्धवट करण्याचा प्रकार चालविला असल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. महापालिकेच्या अनुदानामधून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. आनंदनगर दुसरा क्रॉस येथील रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. पावसाळय़ात पाणी वाहत असल्याने रस्ता अक्षरशः वाहून गेला होता. पावसाळय़ात या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. या ठिकाणी वाहने अडकण्याचा प्रकार घडल्याने नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करणे मुश्कील बनले होते. त्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी करण्यात आली होती. रस्त्याची दुरवस्था झाल्याने महापालिकेच्यावतीने रस्त्याचा विकास करण्यात येत आहे. पण संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करण्याऐवजी निधी नसल्याचे सांगून अर्धवट करण्यात येत आहे.
रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी
येथील रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी अर्ध्याहून अधिक रस्त्यावर खडी घालून ठेवण्यात आली आहे. पण केवळ दोनशे मीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. हा रस्ता करण्यासाठी मनपाकडे निधी नसल्याचे सांगण्यात येत आहे. संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करण्याची सूचना नागरिकांनी कंत्राटदाराला केली. पण निधी नसल्याने तसेच अंदाजपत्रकात पुढील रस्त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली नसल्याचे सांगून रस्ता करण्यास कंत्राटदारांने नकार दिला असल्याची तक्रार रहिवासी करीत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अर्धवट कामाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सदर रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.