पोलिस असल्याचे सांगून 3 तोळय़ाचे दागिने लंपास
वार्ताहर/ निपाणी
पोलिस असल्याचे सांगून अंगावरील दागिने काढून आमच्याकडे द्या, आम्ही तुम्हाला ते दागिने बांधून पिशवीमध्ये देतो, असे सांगून दुचाकीवरून आलेल्या तीन भामटय़ांनी निपाणीतील एका दाम्पत्याचे तीन तोळय़ाचे दागिने लांबवल्याची घटना निपाणी-रामपूर रोडवर बुधवारी घडली.
याबाबत बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, निपाणी येथील एक दाम्पत्य आपल्या दुचाकीवरुन निपाणीहून रामपूर येथे असलेल्या शेताकडे निघाले होते. यावेळी निपाणी – रामपूर रस्त्यावर तीन भामटय़ापैकी एकाने दाम्पत्यास अडवून सध्या निपाणी तालुक्मयात लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीमध्ये दुचाकीवरून घराबाहेर पडणे कायद्यान्वये गुन्हा ठरू शकतो. शिवाय अंगावर सोने असल्याने तुम्हाला धोका होवू शकतो. आम्ही पोलीस असून ते दागिने आपल्याकडे द्या, असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवत दुचाकीवरील पुरूषाने आपली चेन काढून भामटय़ांच्या स्वाधीन केली. त्यावेळी भामटय़ाने त्यांचा हातरुमालात ही चेन बांधून रुमाल पिशवीत टाकला. काही वेळातच महिलेच्या गळय़ातील दागिनेही देण्याची विनंती केली. महिलेच्या गळय़ातील गंठण व इतर तीन तोळय़ाचे दागिने भामटय़ांनी मिळताच हात चलाखीने रुमालात सदर दागिने न बांधता आपल्याकडे ठेवून घेतले. तर हात रुमाल दाम्पत्यांच्या पिशवीत टाकला. काही वेळाने दाम्पत्याला दागिने लांबवल्याचे लक्षात आले.