26 महिन्यांचा वनवास संपणार : संख्याबळ असल्याने भाजपची सत्ता निश्चित
प्रतिनिधी/ निपाणी
जिल्हय़ातील मोठी नगरपालिका असलेल्या व विविध कारणांनी चर्चेत असणाऱया निपाणी नगरपालिकेत शनिवारी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवड होणार आहे. या निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून सध्याच्या संख्याबळानुसार भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने निपाणी पालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार हे निश्चित आहे. असे असले तरी नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळय़ात पडणार याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.
या पदाधिकारी निवडीबरोबरच पालिकेत पंचवार्षिक निवडणूक झाल्यानंतर तब्बल 26 महिन्यांनी सभागृह अस्तित्वात येत आहे. गेले 26 महिने शहरात नामधारी म्हणून वावरणारे नगरसेवक शनिवारी अधिकृतरित्या नगरसेवक म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. सप्टेंबर 2018 मध्ये पालिका निवडणूक झाल्यानंतर पदाधिकारी आरक्षणाचा वाद न्यायालयात गेल्याने गेल्या 26 महिन्यांपासून पदाधिकारी निवड रखडली होती. शनिवारी या निवडीबरोबरच अडीच वर्षांचे प्रशासकराजही संपुष्टात येणार आहे.
नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भाजप व काँग्रेस पुरस्कृत आघाडीच्या नगरसेवकांमध्ये अंतर्गत फोडाफोडीसाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. याचाच एक भाग म्हणून आघाडीतील एक नगरसेवक भाजप गोटात सामील झाला. तर दुसऱया नगरसेवकानेही भाजपच्या कळपात सामील झाल्याची चर्चा शहरात सर्वत्र होत असताना सदर नगरसेवकाने मात्र आपण काँग्रेस आघाडीसोबतच असल्याचे सांगितल्याने या चर्चेवर पडदा पडला. असे असले तरी सध्या भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे भाजपची सत्ता निश्चित मानली जात आहे.
जयवंत भाटले यांची निवड निश्चित?
निपाणी पालिकेत आजवर भाजपच्या चिन्हावर निवडून आलेली व्यक्ती केवळ एकदाच नगराध्यक्षपदावर बसली आहे. त्यामुळे भाजपची सत्ता झाल्यास नगरसेवक जयवंत भाटले यांच्याबरोबरच विनायक वडे, सोनल कोठडिया व भाजपला पाठिंबा दिलेले राजू गुंदेशा यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र भाटले यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर उपनगराध्यक्षपदी सलग दुसऱयांदा सभागृहात प्रवेश करणाऱया नगरसेविका निता बागडे यांची निवड निश्चित मानली जात आहे.
भाजपकडून नगरसेवकांना व्हिप
संख्याबळ असले तरी ऐनवेळी दगाफटका होऊ नये यासाठी भाजपने चिन्हावरील नगरसेवकांना व्हिप दिला आहे. तसेच पाठिंबा दिलेले नगरसेवक व भाजप चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक या सर्वांना बुधवारी सहलीवर पाठविले आहे. हे नगरसेवक शनिवारी सकाळी 10 वाजता सभागृहात येणार आहेत. शहर विकास आघाडीचे काही नगरसेवकही सहलीवर गेले आहेत. शनिवारी सकाळी 10 ते 12 यावेळेत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल होणार आहेत. तर 2 वाजता पदाधिकारी निवड जाहीर होणार आहे.