प्रतिनिधी / निपाणी
भरधाव वेगाने जाणाऱया कारने समोरील ट्रकला मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील चौघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर निपाणीत आंदोलन नगरात मंगळवारी दुपारी 3.45 च्या सुमारास घडला. तुषार कुमार (वय 22), मोहित कुमार (वय 22), अर्पण कुमार (वय 21) व योगेश कुमार (वय 22 सर्वजण रा कानपूर, उत्तर प्रदेश) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.
तुषार, मोहीत, अर्पण व योगेश हे चौघे जण करने क्र. यू.पी. 78 डी.डब्ल्यू. 6078 ने कानपूरहून गोव्याच्या दिशेने जात होते. त्याचवेळी निपाणीनजीक आले असता त्यांच्या कारची समोरील ट्रकला जोराची धडक बसली. यात कारमधील चौघेही गंभीर जखमी झाले. सदर अपघातात कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला होता.
अपघातानंतर जखमींना येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक बनल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापुरातील सीपीआरमध्ये हलविण्यात आले. दरम्यान अपघातामुळे सुमारे अर्धा तास महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. यावेळी पुंजलॉईडच्या पथकाने व पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली नाही. त्यामुळे अन्य वाहनधारक व नागरिकांनी अपघातग्रस्त कार रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.