निपाणी
कोरोनाच्या दुसऱया लाटेने निपाणी परिसरात धुमाकूळ घातला असून 14 दिवसांमध्ये 33 जणांचा बळी गेला आहे. एकंदरीत तालुक्याचा विचार करता हा आकडा खूप मोठा आहे. त्यामुळे निपाणी शहर व ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असले तरी अद्यापही अनेक बेजबाबदार नागरिक अजूनही नियमांचे पालन करताना दिसून येत असल्याने, प्रशासनाने कडक पाऊल उचलणे आवश्यक आहे. हेल्थ बुलेटिननुसार शनिवारी शहरातील 26 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आला आहे.
शनिवारी मिळालेल्या माहितीनुसार हिटणी येथील 65 वर्षीय पुरुष व निपाणीतील जामदार प्लॉट येथील 55 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाची ही दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा जास्त तीव्र असल्याचे जाणवून येत आहे. सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी क्लोजडाऊनचा पर्याय निवडला आहे. मात्र याचा फारसा उपयोग होत नसून अनेक नागरिक विनाकारण फिरत आहेत. शिवाय अत्यावश्यक सेवेसाठी नागरिकांना सकाळच्या सत्रात मुभा देण्यात आली आहे. मात्र यावेळी नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधाचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. यातून कोरोनाच्या फैलावाचा धोका वाढला असून सरकार व प्रशासनाला कठोर नियम लादण्याची वेळ आली आहे. शासकीय आकडेवारीनुसार गेल्या 4 दिवसात निपाणी व परिसरात 53 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
निपाणी परिसरात 200 हून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. यातील जादातर रुग्णांवर घरीच उपचार केले जात आहेत. त्यामुळे अशा रुग्णांच्या संपर्कात घरातील सर्वच व्यक्ती येत असून, अशा व्यक्तींनाही संसर्गाचा धोका असतो. मात्र कोणतीही तपासणी न करता कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती बिनधास्तपणे बाजारात फिरत आहेत. यातील काहीजण जरी कोरोनाबाधित असतील तर बाजारातील सर्वांनाच कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी गांभीर्याने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
बागलकोट जिल्हय़ात नवे 1563 रुग्ण
जमखंडी ः बागलकोट जिल्हय़ात शनिवार दि. 8 रोजी 336 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर 1563 नवे बाधित आढळून आले असून हा आतापर्यंतचा उच्चांक असून तिघांचा आज बळी गेला.
बागलकोट जिल्हय़ात शनिवारी बागलकोट 537, जमखंडी 270, हुनगुंद 251, बदामी 205, मुधोळ 190, बिळगी 110 असे एकूण 1563 जण बाधित झाले. यामुळे आतापर्यंतची बाधित संख्या 23,138 वर पोचली असून यापैकी 17,266 जणांनी कोरोनावर मात केली. तर 186 जणांना प्राणास मुकावे लागले. जिल्हय़ात आतापर्यंत 5 लाख 73 हजार 20 नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेला पाठविण्यात आले. त्यापैकी 5 लाख 47 हजार 332 निगेटिव्ह आढळून आले असून 1,950 नमुन्यांचा अहवाल येणे बाकी असल्याची माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली. 5,686 सक्रिय रुग्णावर उपचार सुरू आहेत.