प्रतिनिधी/ निपाणी
पुन्हा माघारी परतलेल्या कोरोनाने सर्वत्र भीती निर्माण केली आहे. नव्या वर्षात बेळगाव जिल्हय़ात प्रथमच दिवसातील कोरोना रुग्णांची संख्या अर्धशतकाच्या पार गेल्याने धास्ती निर्माण झाली आहे. अशावेळी अलर्ट झालेल्या आरोग्य विभागाने आवश्यक ती तयारी सुरु केली आहे. रुग्णवाढीचा वेग कायम राहिल्यास निपाणीत कोव्हीड केअर सेंटर पुन्हा सुरु करण्याची तयारी आरोग्य खात्याने केली आहे.
निपाणी शहर व परिसरातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. असे असताना चाचणीचा वेग मात्र कमी असल्याने वाढत्या रुग्णसंख्येला अटकाव घालण्यात अडचणी येत आहेत. सध्या निपाणीतील महात्मा गांधी रुग्णालयात दररोज केवळ 25 ते 30 जणांची कोरोना चाचणी केली जात आहे. परिसरातील अनेक रुग्णांची चाचणी व उपचार हे नजीकच्या कोल्हापुरात होत आहेत. मात्र त्याची आकडेवारी ही निपाणीतील प्रशासनाकडे नाही. त्यामुळेही रुग्णवाढीचा धोका निर्माण झाला आहे.
गेल्या काही दिवसात निपाणीत 16 कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी 10 जण कोरोनामुक्त झाले असून उर्वरित 6 जणांवर उपचार सुरु आहेत. याव्यतिरिक्त परिसरातील अन्य काही रुग्णही कोल्हापुरात उपचार घेत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याने तत्काळ उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार आरोग्य, महसूल, पोलीस यांच्या बैठका सुरु आहेत. खासगी रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे जाणवल्यास त्याची तत्काळ माहिती देण्याची सूचना आरोग्य खात्यातर्फे खासगी रुग्णालयांना देण्यात आली आहे. अशा रुग्णांची तत्काळ चाचणी घेऊन त्याचा अहवाल येईपर्यंत देखरेखीसाठी ठेवले जाणार आहे.
गेल्यावर्षी रुग्णसंख्या वाढल्यानंतर उपचारासाठी तवंदी घाटातील मोरारजी देसाई वसती शाळा, श्रीपेवाडी रोडवरील जोल्ले पब्लिक स्कूल याबरोबरच महात्मा गांधी रुग्णालय व खासगी रुग्णालयांमध्येही कोव्हीड केअर सेंटर उभारण्यात आले होते. यानंतर कोरोना रुग्णसंख्या पूर्णपणे घटल्यानंतर सदर कोव्हीड केअर सेंटर बंद करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा रुग्णसंख्या वाढत चालल्याने आरोग्य विभागाने कोव्हीड केअर सेंटर सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे. खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी आलेल्या रुग्णांना कोव्हीड चाचणी बंधनकारक करण्याची सूचना पुन्हा एकदा खासगी रुग्णालयांना देण्यात आली आहे.