वार्ताहर/ निपाणी
शासनाने गुटखा बंदी केली असली तरी पानमसाला व सुगंधी तंबाखू याच्या स्वतंत्र पुढय़ा उपलब्ध करून उत्पादकांनी गुटखा शौकिनांची तलफ भागविण्याचे काम केले आहे. सध्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद आहेत. अशा काळातही गुटख्याची राजरोस विक्री सुरू असून दरवाढीतून निपाणीत गुटख्याचा काळाबाजार सुरू असल्याचे दिसत आहे. दरवाढीतून शौकिनांची लूट सुरू असली तरी प्रशासनाने कारवाईकडे दुर्लक्ष केले आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त सर्व व्यवहार थांबविण्यात आले आहेत. अशा काळात सामान्य माणूस घराबाहेर पडायलाही घाबरत आहे. पोलीस प्रशासनाकडून होणाऱया कारवाईची भिती प्रत्येकाच्या मनामनात रुजली आहे. असे असताना गुटखा विक्री करणारे घाऊक विक्रेते मात्र वेगवेगळी ठिकाणे शोधून किरकोळ विक्रेत्यांना गुटख्याची विक्री करत आहेत.
लॉकडाऊनमुळे उत्पादन थांबले असतानाही घाऊक विक्रेत्यांकडे मुबलक गुटखा उपलब्ध आहे. वेगवेगळय़ा गोडाऊनमध्ये साठा करून त्याची विक्री चढय़ा दराने केली जात आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन किरकोळ विक्रेते मिळेल त्या किंमतीला गुटख्याची खरेदी करून विकत आहेत. 15 दिवसानंतरही गुटखा उपलब्ध होत असल्याने उत्पादन सुरू असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सध्या 5 रुपयाची गुटख्याची पुडी 8 रु., 10 रुपयाची पुडी 25 रुपयाला विकली जात आहे. घाऊक विक्रेत्यांनीच मनमानी दरवाढ केल्याने किरकोळ विक्रेत्यांनाही दरवाढ करावी लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. सुरू असलेला हा प्रकार थांबविण्यासाठी घाऊक विक्रेत्यांवर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रातही पुरवठा
महाराष्ट्रात पूर्णपणे गुटखा बंदी आहे. यामुळे गेल्या दोन वर्षापासून निपाणीतील विपेत्यांकडूनच महाराष्ट्रातील विक्रेत्यांना गुटखा दिला जातो. लॉकडाऊनमध्ये सर्वत्र नाकाबंदी असताना देखील महाराष्ट्रातील ग्रामीण भागात देखील गुटखा पुरविला जात आहे. खाण्याच्या तंबाखूचीही तिच परिस्थिती असून कृत्रिम मंदीचा लाभ घेण्यात येत आहे.