8 ग्रॅम सोन्यासह 50 हजाराचा ऐवज लंपास : हरीनगर येथील घटना
प्रतिनिधी/ निपाणी
लॉकडाऊन काळात चोरीचे सत्र थांबले होते. मात्र लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता येताच पुन्हा चोरटय़ांनी डोके वर काढले आहे. निपाणी येथील हरीनगरात बंद घरात डल्ला मारुन 8 ग्रॅम सोने, 10 हजाराची रोकड असा सुमारे 50 हजाराचा ऐवज लांबवला. नवनाथ वकरे असे चोरी झालेल्या भाडोत्री कुळाचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री उघडकीस आली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, हरीनगर पहिली गल्ली येथे अशोक भंडारी यांचे दुमजली घर आहे. त्याठिकाणी नवनाथ वकरे हे भाडेकरु म्हणून राहतात. दरम्यान काही कामानिमित्त ते आपल्या मूळगावी कागल तालुक्यातील हमिदवाडा येथे शुक्रवारी सायंकाळी गेले होते. दरम्यान घर बंद असल्याचे सावजून चोरटय़ांनी रविवारी दुपारी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. यानंतर बॅगमध्ये असलेल्या लहान मुलांच्या सोन्याच्या चार अंगठय़ा, कानातील ऐवज असे 8 ग्रॅमचे दागिने व 10 हजार रुपये रोकड चोरटय़ांनी लांबविली. दरम्यान रविवारी 4 च्या सुमारास दरवाजाचे कडीकोयंडा तुटल्याचे नजीकच्या नागरिकांना लक्षात येताच याची माहिती वकरे यांना देण्यात आली. रविवारी सायंकाळी वकरे परतल्यानंतर सदर घटनेचा उलगडा झाला. शहर उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार, हवालदार गजानन भोई यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरी प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
पुन्हा चोरटे फोफावले
गत दोन महिन्यापासून निपाणीसह ग्रामीण भागात चोरटे पुन्हा फोफावल्याचे लक्षात येते. अमलझरी येथील रेणुका मंदिरात चोरी, अरुण खराडे यांच्या शेतवाडीतील चंदनाचे झाड लांबवले. निपाणी श्रीनगरात बंगला फोडून 5 तोळे दागिने व 20 हजाराची रोकड लंपास अशा घटना घडल्या आहेत. असे असतानाच पुन्हा हरीनगर येथे चोरटय़ांनी बंद घर फोडल्याने या घटनांचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.