8 दुचाकींसह पावणे चार लाखांचा मुद्देमाल जप्त, पुढील तपास सुरू
प्रतिनिधी /निपाणी
निपाणीत मंगळवारी पहाटे संशयास्पदरित्या फिरणाऱया दुचाकीस्वारास पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर त्याची चौकशी केली असता तो अट्टल चोरटा निघाला. निपाणी शहरातून गेल्या वर्षभरात त्याने आठ दुचाकींच्या चोरीबरोबरच एका ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. ओंकार रमेश निकम (वय 24, रा. कामगार चौक, निपाणी) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याला निपाणी पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, निपाणीचे सीपीआय संगमेश शिवयोगी हे सोमवारी रात्रभर सहकाऱयांसह शहरात गस्त घालत होते. याचवेळी मंगळवारी पहाटेच्या सुमारास चिकोडी रोडवरून ओंकार हा दुचाकीने बसस्थानकाच्या दिशेने येत होता. याचवेळी त्याचा संशय आल्याने सीपीआय शिवयोगी यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी त्याच्याकडील दुचाकीची कागदपत्रे नसल्याने त्याला बसवेश्वर पोलीस स्थानकात आणले. यावेळी त्याची कसून चौकशी करताच त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली.
गेल्या वर्षभरात निपाणी शहरात विविध ठिकाणांहून 8 दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली. तसेच काही दिवसांपूर्वी पावले गल्ली येथे घरफोडी होऊन रोख रकमेसह साडेतीन तोळे सोने लंपास झाल्याची घटना घडली होती. ही चोरीही आपणच मित्राच्या साहाय्याने केल्याचे ओंकार याने कबूल केले. यावेळी ओंकार याच्या घट्टे गल्ली येथील अल्पवयीन मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.