प्रतिनिधी/ निपाणी
जेष्ठ पत्रकार, बेळगावमधील लोकमान्य ग्रंथालयाचे प्रमुख, विविध सार्वजनिक संस्थांचे मार्गदर्शक, मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक तसेच सीमालढा व विविध चळवळींच्या माध्यमातून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेले अशोक याळगी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना निपाणीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने श्रद्धाजंली वाहण्यात आली. यावेळी अच्युत माने, एस. आर. बाईत, जयराम मिरजकर यांनी अशोक याळगी यांच्या आठवणींना उजाळा दिला. याळगी यांची निर्बीड पत्रकार अशी ख्याती होती. सीमाप्रश्नाच्या लढय़ात होणारे धरणे, सत्याग्रह, मोर्चा अशा कार्यात सुरुवातीपासून ते आघाडीवर होते. त्यांच्या निधनाने सीमा लढय़ातील एक खंदा सहकारी हरपल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी बाळासो हजारे, विठ्ठल वाघमोडे, बी. टी. तराळ, प्रकाश साळुंखे, आनंदा रणदिवे, नंदू कांबळे यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.