निपाणी/ प्रतिनिधी
लॉकडाऊनमुळे अडकून बसलेल्या मुळचे कर्नाटकचे मात्र रोजगारानिमित्त हडपसर पुणे येथील मजुरांना महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसमधून कर्नाटकातील गायकवाडी येथे आणून सोडण्यात आले. तेथून हे मजूर पायी निपाणीकडे येत असल्याचे कळताच निपाणी शहर पोलीस स्थानकाचे फौजदार कुमार हडकर यांनी या मजुरांना देवचंद कॉलेजजवळ असलेल्या तपासणी नाक्मयाजवळ थांबवून ठेवले.
याबाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटकातील बिदर, रायचूर, यादगिरी, गुलबर्गा, बागलकोट येथील सुमारे 60 मजूर कामानिमित्त पुणे येथे कार्यरत होते. मात्र लॉकडाऊनमुळे या मजुरांना काम नसल्याने त्यांना मूळ गावी परतायचे होते. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून या सुमारे 60 मजूर व त्यांच्या कुटुंबीयांना कर्नाटकच्या दिशेने पाठविण्यात आले. मात्र कोगनोळी नाक्मयावरून त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे बस चालकांनी बस कागलमधून निढोरीमार्गे निपाणीच्या दिशेने आणली. महाराष्ट्र हद्दीतील लिंगनूर गाव सोडल्यानंतर कर्नाटकात प्रवेश करताच गायकवाडी येथे या मजुरांना उतरवून बस पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेने गेल्या. हे मजूर गायकवाडीपासून निपाणीच्या दिशेने पायी चालत आले. फौजदार कुमार हडकर यांनी या मजुरांना देवचंद कॉलेजजवळ असलेल्या तपासणी नाक्मयावर थांबविले.
या ठिकाणी या मजुरांची आरोग्य तपासणी झाल्यानंतर तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी या मजुरांना कर्नाटकात पाठविण्यासाठी ई पास तयार करण्याचे काम हाती घेतले. फौजदार हडकर यांनी या मजुरांच्या जेवणाची सोय केली आहे. पास तयार झाल्यावर त्यांना त्यांच्या गावच्या दिशेने पाठविण्यात येणार आहे.