निपाणी
प्लास्टिकचा वापर प्रदूषण वाढीचे प्रमुख कारण आहे. स्वच्छता मोहीम यशस्वी करताना वाढता प्लास्टिकचा वापर गतिरोधक ठरत आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निपाणीत नगरपालिकेतर्फे प्लास्टिकविरोधी धडक कारवाई सुरू आहे. शुक्रवारी ही कारवाई अधिक तीव्र करताना नगरपालिका अधिकाऱयांनी प्लास्टिक दुकानासह एका बेकरीवर कारवाई करताना वापरण्यात येणारे 53 किलो प्लास्टिक जप्त केले. त्याचप्रमाणे 30 हजाराची दंड वसुली केली.
निपाणी नगरपालिकेच्यावतीने गेल्या वर्षभरापासून प्लास्टिक बंदीविषयी जागृती सुरू आहे. यामध्ये अनेक विक्रेते व व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये प्लास्टिक जप्ती व दंडात्मक वसुली करूनही प्लास्टिकचा वापर सर्रासपणे सुरू आहे. यामुळे पालिकेने प्लास्टिकविरोधी कारवाई तीव्र करताना 6 जानेवारी रोजी 27 किलो प्लास्टिक विक्रेत्याकडून जप्त करताना 27 हजाराचा दंडही वसूल करण्यात आला होता.
या कारवाईला अवघे चार दिवस उलटतात न उलटतात तोच नगरपालिकेने आयुक्त महावीर बोरण्णावर यांच्या नेतृत्वाखाली येथील हदाले यांच्या प्लास्टिक दुकानातून व हिंदुस्थान बेकरी येथे कारवाई केली.