प्रतिनिधी/ निपाणी
निपाणी शहरात शनिवारी विकेंड लॉकडाऊनला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील विविध परिसरात दिवसभर वर्दळ सुरुच असल्याने पोलीस व नगरपालिका प्रशासनाच्या या हलगर्जीपणाबद्दल सुज्ञ नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात आला. विकेंड लॉकडाऊनमध्ये बंद ठेवण्यात येणाऱया यादीतील दुकानेही काही ठिकाणी सुरुच असल्याने प्रशासनाकडून दुजाभाव होत असल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे.
कर्नाटक सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार व रविवारी विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. हे दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारच्या दुकानांसाठी बंद असणार आहेत. असे असतानाही प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे काही मोठे व्यापारी बिनधास्तपणे आपली दुकाने खुली ठेवत आहेत. असे असताना मात्र लहान व्यापारी अथवा दुकानदार आपले दुकान सुरु ठेवल्यास त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पालिका, पोलीस प्रशासन पुढे सरसावत आहे. प्रशासनाच्या या दुजाभावामुळे विकेंड लॉकडाऊनचा नेमका उद्देशच मागे पडत असल्याने सर्वसामान्य नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
विकेंड लॉकडाऊनची योग्यप्रकारे अंमलबजावणी करता येत नसेल तर प्रशासनाने याची सक्ती करु नये. आठवडय़ातील दोन दिवस व महिन्यातील 8 दिवस विकेंड लॉकडाऊनमुळे दुकान बंद ठेवावे लागत असल्याने सर्वसामान्य व लहान दुकानदारांना याचा मोठा फटका बसत आहे. तर काही बडे व्यापारी प्रशासनातील अधिकाऱयांना हाताशी धरुन आपली दुकाने नियमबाहय़ सुरु ठेवत असल्याने प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.