प्रतिनिधी/ निपाणी
निपाणी शिवाजीनगर पहिली गल्ली येथील अलका रमेश पाटील यांचे बंद घर फोडून रोख 40 हजार व साडेसहा तोळे सोने असे एकूण 3 लाख 10 हजार रुपये ऐवज चोरटय़ांनी लांबविला. दरम्यान वाढत्या चोरींच्या घटनामुळे निपाणीसह उपनगरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना मंगळवारी सकाळी 9.30 च्या सुमारास उघडकीस आली. य्ािंमुळे निपाणीसह परिसरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, शिवाजीनगर पहिली गल्लीत राहणाऱया अलका रमेश पाटील या आपल्या नातेवाईकांकडे कोल्हापुरला गेल्या होत्या. हीच संधी साधून चोरटय़ांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला व तिजोरीतील साहित्य विस्कटून चोरटय़ांनी रोख 40 हजार रुपये, 2 तोळ्य़ाचे सोन्याचे गंठण, सोन्याच्या दोन अंगठय़ा 1 तोळा, सोन्याचा हार साडेतीन तोळा असा एकूण 3 लाख 10 हजाराचा ऐवज लंपास केला.
ही घटना मंगळवारी सकाळी शेजारच्या आजी शांताबाई परशराम पाटील यांच्या लक्षात आली. या आजी सदर घरात गेल्यानंतर आतमध्ये कोणीच नसल्याचे लक्षात आले. तिजोरीतील साहित्य विस्कटलेले होते. यानंतर ही घटना आजींनी शेजाऱयांना सांगितली. अलका पाटील या बाहेरगावी गेल्याने त्यांना ही माहिती दूरध्वनीवरून देण्यात आली. अलका या मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास घरी आल्या असता त्यांना हा प्रकार पाहून धक्काच बसला. घटनेची माहिती मिळताच साहाय्यक उपनिरीक्षक एम. जी. निलाखे, हवालदार राजू दिवटे, उदय कांबळे, संदीप गाडीवड्डर यांनी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास उपनिरीक्षक कुमार हडकर करीत आहेत.
महिन्यात 27 तोळे सोने लांबविले
गत महिन्याभरात केवळ निपाणी शहरात चोरीच्या सहा मोठय़ा घटना घडल्या आहेत. यात सुमारे सव्वा दोन लाख रुपयांच्या रोकडसह तब्बल 27 तोळे सोने असा सुमारे साडेतेरा लाख रुपयांचा ऐवज लांबविण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांसह महिलावर्गातून भीती व्यक्त होत असून, चोरटय़ांचा शोध घेण्यात निपाणी पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे सध्या शहर चोरटय़ांपासून असुरक्षित बनले असून, शहरवासीयांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.