2022 साठीच्या पुरस्कारासाठी निवड
प्रतिनिधी/ बेळगाव
केंद्रीय गृहमंत्रालयाने निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकाला संपूर्ण राज्यात सर्वोत्तम पोलीस स्थानकाचा किताब दिला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली असून यासाठी त्यांनी निपाणी पोलिसांचे कौतुक केले आहे.
केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या एका समितीने 2022 सालासाठीच्या सर्वोत्तम पोलीस स्थानकाच्या निवडीसाठी बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर व निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकांना भेटी देऊन पाहणी केली होती. या भेटीदरम्यान दोन्ही पोलीस स्थानकाचे मूल्यमापन करण्यात आले होते.
पोलीस स्थानक व त्याबाहेरील स्वच्छता, इमारतीची देखभाल, लॉकअप रूम, पोलिसांसाठीचे विश्रांतीगृह, महिला पोलिसांसाठीचे विश्रांतीगृह, दस्तऐवज ठेवण्यासाठीचे विशेष ठिकाण, सुरक्षितता, शौचालय व्यवस्था, गुन्ह्यांचा तपास, जुन्या प्रकरणांचा निपटारा, गुन्हेगारी प्रकरणात न्यायालयाकडून होणारी शिक्षा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती आदी मापदंडांच्या आधारावर मूल्यमापन करण्यात आले होते.