वार्ताहर/ निपाणी
निपाणी तालुक्यातील लॉकडाऊन संपताना सोमवारी सर्व व्यवहार सुरक्षित सुरू झाले. यामुळे काहीसे समाधान व्यक्त होत असतानाच निपाणी शहरातील एका 52 वर्षीय इसमाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. शहरातील बड्डे गल्लीतील हा इसम असून पालिका प्रशासनाने खबरदारी घेत हा परिसर सीलडाऊन केला. तालुक्यातील कोरोनाच्या या सहाव्या मृत्यूमुळे शहरासह ग्रामीण भाग हादरुन गेला आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, बड्डे गल्ली येथील 52 वर्षीय इसमाला सकाळी 9.30 च्या सुमारास श्वसनाचा त्रास सुरू झाला. स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले असता त्या डॉक्टरनी ऑक्सिजन कमी पडत असल्याने गांधी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. यानंतर गांधी रुग्णालयात दाखल केले असता तिथे त्यांची अँटीजेन टेस्ट घेण्यात आली. यामध्ये त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर त्या रुग्णाला गांधी रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने बेळगावला हलविण्यासाठी ऍम्ब्युलन्सची सोय केली. या ऍम्ब्युलन्समधून रुग्णाला बेळगावकडे नेण्यात येत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. यामुळे शहरासह ग्रामीण भागात भीती व्यक्त होत असून कोरोना प्रतिबंधासाठी नियमांचे पालन केल्याशिवाय पर्याय नाही याचीच चर्चा सुरू होती. प्रशासनाने या बाधिताच्या संपर्कात आलेल्या 11 जणांना क्वारंटाईन केले आहे.