वार्ताहर/ सौंदलगा
बेळगाव जिल्हय़ात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. निपाणी तालुक्यात आतापर्यंत 116 हून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली असून यातील 13 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दरम्यान निपाणी तालुक्याचा कोरोना मृत्यू दर 11 टक्क्यांहून अधिक असल्याने आरोग्य खात्याची डोकेदुखी वाढली आहे. रविवारी रात्री सौंदलगा येथील कोरोनाबाधित 55 वर्षीय भाजीविक्रेत्याचा बळी गेल्याचे स्पष्ट झाल्याने तालुका पुन्हा धास्तावला आहे. तर निपाणीत सोमवारी दिवसभरात तीन कोरोनाबाधित आढळले.
सौंदलगा येथील भाजीपाला विक्रेत्याचे गोकाक आणि बेळगाव येथे खरेदीच्या निमित्ताने जाणे-येणे सुरू होते. दरम्यान गत दोन दिवसापूर्वी त्यांना रक्तदाब आणि दम्याचा त्रास सुरू झाला होता. तब्येत अधिकच खालावल्याने बुधवारी रात्री निपाणीतील गांधी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांची रॅपीड चाचणी करण्यात आली. यात त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यांचा यातच मृत्यू झाला.
दरम्यान त्यांच्या सोबत असलेल्या पाचजणांची पीपीई किटची सोय करण्यात आली. सदर पाचजणांच्या उपस्थितीत ग्रा. पं. पीडीओ व काही मोजक्या अधिकाऱयांच्या समक्ष सौंदलगा येथे कोरोना बाधितावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर रुग्णासोबत आलेल्या नातेवाईकांना होमक्वारंटाईन करण्यात आले असून बाधित राहत असलेली कुंभार गल्ली सील केली आहे. दरम्यान ग्रा. पं. तर्फे औषध फवारणीसह अन्य उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
निपाणी शहरात 7 तर तालुक्यातील मांगूर, कारदगा, माणकापूर, गळतगा, यमगर्णी, सौंदलगा येथे प्रत्येकी एकाचा कोरोनाने बळी गेला आहे. दरम्यान कोरोना बाधितांच्या वाढत्या मृत्यू संख्येमुळे आरोग्य प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून कोरोना चाचणी व उपचार जलद करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.
निपाणीत तिघांना बाधा
निपाणी : आरोग्य खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दिवसभरात निपाणी शहरातील तिघाजणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये पावले गल्ली येथील 65 वर्षीय पुरुष, बिरोबा माळ येथील 66 वर्षीय पुरुष तर बागवान गल्ली येथील 62 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाली आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरवासियांनी खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
विजापूर जिल्हय़ात नवे 92 रुग्ण
विजापूर : जिल्हय़ात सोमवारी 92 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून दोघांचा बळी गेला आहे. त्यानुसार आतापर्यंत बाधितांची संख्या 3224 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 9 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 2193 जण कोरोनामुक्त झाले आहे. जिल्हा कोविड रुग्णालयात 993 बाधितांवर उपचार सुरू आहेत. एकूण मृतांची 38 इतकी झाली आहे.