प्रतिनिधी/ निपाणी
येथील वॉकर्स मंडळाच्यावतीने निपाणी नगरपालिकेला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये कचरा निर्मूलन, पथदीप व्यवस्था करावी, छत्रपती शिवाजी गार्डनमध्ये ओपन जिम उभारावी तसेच शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा आदी विविध मागण्या करण्यात आल्या. निवेदन स्वीकारल्यानंतर पालिका आयुक्त महावीर बोरण्णावर यांनी टप्प्याटप्प्याने शहरातील सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी मंडळाच्यावतीने शहरात स्वच्छता कामे चांगल्या पद्धतीने राबविल्याबद्दल आयुक्त बोरण्णावर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अरुण चव्हाण, दिलीप आवळेकर, डॉ. विनायक तिळवे, लक्ष्मण जाधव, प्रताप पाटील, सिकंदर माळकरी, नारायण पाटील यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.