800 ते 1000 रुपये प्रतिकिलो दर : सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
प्रतिनिधी / निपाणी
गुरुवारी भरलेल्या येथील बाजारात मिरचीचे दर कडाडल्याचे दिसून आले. सध्या जवारी मिरचीचे दर हे 800 ते 1000 रुपये प्रतिकिलो झाल्याने गृहिणींसह सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेल, गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल आदींचे दर वाढत असतानाच आता मिरचीचेही दर गगनाला भिडत असल्याने सर्वसामान्यांनी जगायचे कसे? असा प्रश्न पुढे येत आहे. मिरची दराने उच्चांक गाठल्याने नागरिकांकडून खरेदीसाठी हात आखडते घेतले जात आहेत. निपाणी आठवडी बाजारात मिरचीची आवक मोठय़ा प्रमाणात झाली आहे. पावसाळय़ापूर्वी गृहिणी मिरची खरेदी करून वर्षभरासाठी चटणीची सोय करतात. मात्र यावर्षी मिरची दराने उच्चांक गाठला असल्याने सर्वांचेच बजेट कोलमडले आहे. बॅडगी मिरची 300 ते 400 रु. तर जवारी मिरची 800 ते 1000 रुपये प्रतिकिलो दराने विक्रीसाठी ठेवली आहे. महागाईचा आलेखा वाढत चालल्याने नागरिकांत चिंता पसरली आहे.