पाच तोळय़ाचे सोन्याचे दागिने लंपास : पावणे तीन लाखांवर डल्ला : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वार्ताहर /निपाणी
शहराबाहेरील शाहूनगर येथे गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशेजारी भरदिवसा धाडसी चोरीचा प्रकार शनिवारी रात्री उघडकीस आला. यामध्ये चोरटय़ांनी पाच तोळे दागिने, रोख रक्कम असा सुमारे 2.75 लाखांचा ऐवज लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. चोरीच्या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मूळचे आणूर (ता. कागल) येथील शशिकांत ईश्वरा तोडकर हे पत्नी व मुलांसोबत शनिवारी सकाळी आपल्या मूळ गावी आणूर येथे गेले होते. रात्री आठच्या सुमारास ते घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला. तोडकर यांचे कौलारू घर आहे. चोरटय़ांनी घराच्यावरील कौले काढून आतमध्ये प्रवेश करून तिजोरी फोडली. त्यामध्ये असलेले सोन्याचे दागिने व रोकड लांबविल्याचे तोडकर यांच्या लक्षात आले.
चोरटय़ांनी अडीच तोळय़ाचे गंठण, एक तोळय़ाच्या दोन अंगठय़ा, सव्वा तोळय़ाची सोनसाखळी व रोख रक्कम असा 2 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे दिसून आले. दरम्यान, घटनास्थळी शहर पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. निपाणी शहर व उपनगरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच भर दिवसा चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची दखल घेत पोलिसांनी रात्रीची गस्त घालण्याबरोबरच चोरीच्या घटना रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना हाती घेण्याची गरज व्यक्त होत आहे.