प्रतिनिधी/ बेळगाव
कसाई गल्ली येथील मनपाच्या मटण मार्केटमधील गाळेधारकांनी भाडे भरले नसल्याने मार्केटला टाळे ठोकण्यात आले होते. मात्र, निम्मे भाडे भरण्याची ग्वाही भाडेकरूंनी दिल्याने टाळे खोलून गाळेधारकांना व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली. भाडे भरण्यासाठी 32 लाखांचे चलन तयार करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
महापालिकेने मटण मार्केटच्या इमारतीचे बांधकाम करून गाळे भाडे तत्त्वावर दिले आहेत. या ठिकाणी 40 गाळे भाडेकरूंना देण्यात आले होते. मात्र, गाळेधारकांनी भाडे भरले नसल्याने 46 लाख रुपये भाडे थकले आहे. सदर रक्कम दंडासह 65 लाख रुपये झाल्याने भाडे भरण्यास गाळेधारकांनी टाळाटाळ चालविली होती. यामुळे महापालिकेच्या महसूल विभागाने मागील सोमवारी मटण मार्केटमधील गाळय़ांना टाळे ठोकण्याची कारवाई केली होती. थकीत भाडय़ापैकी 25 टक्के रक्कम भरण्याची तयारी गाळेधारकांनी दर्शविली होती. मात्र 50 टक्के रक्कम जमा केल्यासच गाळे खोलून देण्यात येतील, असे महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी सांगितले होते. शनिवारी महापालिका कार्यालयात आयुक्त जगदीश के. एच., माजी नगरसेवक बाबुलाल मुजावर आणि मटण मार्केटमधील व्यापाऱयांची बैठक झाली. यावेळी चर्चेनंतर गाळेधारकांनी निम्मी रक्कम भरण्याची तयारी दर्शविली. चलन दिल्यानंतर दोन दिवसात रक्कम जमा करण्याची ग्वाही देण्यात आल्यामुळे गाळेधारकांना मटण मार्केटमधील टाळे खोलून देण्यात आले. उर्वरित रक्कम आणि नियमित भाडे भरण्याची सूचना गाळेधारकांना करण्यात आली. जर भाडे पुन्हा थकविल्यास भाडे करार रद्द करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
मार्केटचे महसूल निरीक्षक रजेवर असल्याने शनिवारी चलन देण्यात आले नव्हते. पण सोमवारी चलन तयार करून महसूल अधिकाऱयांच्या सहीकरिता देण्यात आले आहे. सही झाल्यानंतर चलन देण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.