प्रतिनिधी/ कराड
नागरी विमान वाहतूक मंत्रालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनांच्या आधारे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) कराड विमानतळाचा कलर कोडेड झोनिंग नकाशा तयार केला आहे. हा नकाशा कंपनीने सोमवारी आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार कराड नगरपालिकेने गेले 5 महिने थांबवलेल्या बांधकाम परवानग्या देण्यास आजपासून प्रारंभ केला आहे. या नकाशानुसार 50 टक्के कराड शहर फिक्कट लाल रंगाने दर्शवण्यात आले असून या क्षेत्रातील बांधकाम परवानग्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर देण्यात येणार आहेत. तर उर्वरित कराड शहरात नगरपालिका स्तरावर त्या त्या झोनमधील उंचीच्या मर्यादेत परवानग्या देण्यात येणार आहेत.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी दिल्ली येथे केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंदिया, भारतीय विमानपत्तन प्राधिकरणचे अध्यक्ष संजीवकुमार यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी तत्काळ कलर कोडेड झोनिंग मॅपला मंजुरी देत बांधकाम परवानग्या देण्याचा प्रश्न मार्गी लावला होता. तर खासदार श्रीनिवास पाटील यांनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला होता. तर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी याबाबत एमएडीसीकडे पाठपुरावा केला होता.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने कराड विमानतळ परिसरात बांधकामे करण्यासाठी उंचीबाबत ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यप्रणाली व अर्जदारांसाठी असणाऱया मार्गदर्शक सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या आहेत. कलर कोडेड झोनिंग मॅपनुसार कराड विमानतळाच्या मध्यापासून 3 किलोमीटरचे हवाई अंतर पूर्वेला निश्चित करण्यात आले आहे. पूर्वेला कराड शहर असून कराड शहरातील कमळेश्वर मंदिर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन ते इदगाह मैदान, भेदा चौक, बनपुरी कॉलनी ते कोल्हापूर नाका प्रवेश कमान याच्या आतील कोयना नदीबाजूचा सर्व भाग फिक्कट लाल रंगाने दर्शवण्यात आला आहे. यात प्रामुख्याने गावठाणाचा समावेश असून येथील सर्व बांधकामांना महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. या भागात बांधकामे करता येणार आहेत. मात्र त्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक आहे. या भागातील उंचीची मर्यादा स्पष्ट झालेली नाही.
कलर कोडेड झोनिंग मॅपमध्ये विमानळाच्या पूर्वेला कराड शहर असून त्यात निम्मे शहर 3 किमी अंतरात येत असल्याने ते फिक्कट लाल रंगात येत असल्याने त्या परवानग्यांसाठी ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. तर विमानतळाच्या पश्चिम बाजूला पाटणरोड भागात 5 किलोमीटरपर्यंत फिक्कट लाल भाग दर्शवला आहे. तसेच विमानतळाच्या दक्षिण व उत्तर बाजूस प्रत्येकी सव्वा दोन किलोमीटर अंतरात बांधकामांसाठी विमानतळ कंपनीचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.
निम्म्या शहराच्या बांधकाम परवानग्या पालिका स्तरावर
दरम्यान, या नकाशामध्ये जांभळा रंग दर्शवलेल्या भागात 30 मीटर उंचीपर्यंत, निळा रंग दर्शवलेल्या भागात 40 मीटर उंचीपर्यंत, पिवळा रंग दर्शवलेल्या भागात 50 मीटर उंचीपर्यंत, करडा रंग दर्शवलेल्या भागात 80 मीटर उंचीपर्यंत, पिवळा रंग दर्शवलेल्या भागात 110 मीटरपर्यंत तर हिरवा रंग दर्शवलेल्या भागात 140 मीटर उंचीपर्यंत नगरपालिका स्तरावर बांधकाम परवानगी देण्यात येणार आहे. या परवानग्या आजपासून देण्याची प्रक्रिया नगरपालिकेने सुरू केली असल्याची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली.