ग्रीन झोनमधील 13 जिल्हय़ांना लाभ : बेळगावसह 8 जिल्हे लॉकडाऊन कडकच
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोनामुळे जारी झालेला लॉकडाऊन 3 मे पर्यंत संपण्याची चिन्हे अद्याप दिसून आलेली नाहीत. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढविण्याचे संकेत मिळाले आहेत. दरम्यान, राज्याच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी निम्म्या कर्नाटकात म्हणजेच ग्रीन झोनमध्ये येणाऱया 13 जिल्हय़ांमध्ये लॉकडाऊन आणखी शिथिल करण्यात आले आहे. मात्र बेळगावसह रेड झोनमध्ये असणाऱया 8 जिल्हय़ांमध्ये ही सूट नसेल. मंगळवारी सरकारने याबाबतचा आदेश दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कोरोना आणि लॉकडाऊनसंबंधीची माहिती घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सर्व जिल्हाधिकाऱयांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून महत्त्वाच्या सूचना केल्या. त्यानुसार मंगळवारी राज्य सरकारने नवी मार्गसूची जारी केली आहे. पुढील आदेशापर्यंत ही मार्गसूची जारी राहणार आहे.
13 जिल्हय़ांसाठी नवी मार्गसूची
चामराजनगर, कोप्पळ, चिक्कमंगळूर, रायचूर, चित्रदुर्ग, रामनगर, हासन, शिमोगा, हावेरी, यादगिर, कोलार, उडुपी आणि कोडगू हे 13 जिल्हे सध्या कोरोनामुक्त असल्याने यांचा समावेश ग्रीन झोनमध्ये आहे. या जिल्हय़ांमध्ये नवी मार्गसूची जारी करण्यात आली आहे. त्यामुळे येथील व्यवहार आणखी गतीमान होणार आहेत. या जिल्हय़ांमधील नगरपालिका, महानगरपालिकांच्या कार्यकक्षेबाहेरील प्रदेशात औद्योगिक क्षेत्र सुरू करता येईल, असे राज्य सरकारच्या मुख्य सचिवांनी पत्रकात म्हटले आहे.
ग्रीनझोनमधील सर्व उत्पादन केंद्रे, उद्योग सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. येथे 50 टक्के किवा त्यापेक्षा कामगारांना हजर राहता येणार आहे. शिवाय मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे निर्यात होणाऱया वस्तूंच्या उत्पादन केंद्रांना, विशेष आर्थिक क्षेत्रांमध्ये (सेझ) मोठय़ा प्रमाणात लोकांना प्रवेश देण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
शिवाय बांधकाम प्रकल्प, डाऊनशिपची कामे सुरू असताना कामगारांना त्या प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातच राहण्याची व्यवस्था करावी, कामगारांना कामाच्या ठिकाणी आणण्यासाठी सामाजिक अंतराचे भान ठेवून वाहतूक व्यवस्था करावी. व्यापारी संकुलांमधील आणि बाजारपेठांमधील दुकाने सुरू ठेवता येतील. पण मॉल आणि मद्य दुकाने सुरू करण्यावरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.
ऑरेंज झोनमध्ये जिल्हा प्रशासन घेणार निर्णय
ऑरेंज झोनमधील कारवार, धारवाड, बेंगळूर ग्रामीण, गदग, तुमकूर, चिक्कबळ्ळापूर आणि मंडय़ा जिल्हय़ांमध्ये रुग्णसंख्या कमी प्रमाणात आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणती दुकाने सुरू ठेवावीत, कोणत्या उद्योगांना सूट द्यावी याबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य संबंधित जिल्हय़ांचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पालकमंत्र्यांना देण्यात आले आहे.
रेडझोनमध्ये लॉकडाऊन पुर्वीप्रमाणेच जारी
बेंगळूर शहर, बेळगाव, विजापूर, बागलकोट, गुलबर्गा, म्हैसूर, बिदर आणि मंगळूर या जिल्हय़ांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या अधिक असल्याने हे जिल्हे केंद्र सरकारने रेड झोनमध्ये समाविष्ट केले आहेत. या भागात मागील मार्गसूचीप्रमाणेच लॉकडाऊनचे नियम लागू राहणार आहेत.