वीजखांब भुईसपाट झाल्याने संपूर्ण परिसर अंधारात
वार्ताहर /उचगाव
बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील उचगावनजीक बेळगुंदी फाटय़ाजवळ चालकाचा ताबा सुटून ट्रक थेट एका फार्महाऊसच्या आवारात घुसला. विद्युतभारीत खांबांना आदळून तो कोसळला व तारा भुईसपाट केल्या. अशा प्रकारची ही चौथी घटना सोमवारी रात्री घडली. रहदारी नसल्याने मोठा अनर्थ टळला. सदर फाटा म्हणजे आता मृत्यूचा सापळाच बनला आहे. मंगळवारी दिवसभर विद्युतपुरवठा ठप्प झाला होता.
या ट्रक चालकाचे नशीब बलवत्तर म्हणून तारांचा स्पर्श होऊनदेखील तो बालबाल बचावला व त्याने घटनास्थळावरून पलायन केले. बेळगाव-वेंगुर्ला हा मार्ग विपुल रहदारीचा बनला आहे. रात्रीच्यावेळी रहदारी कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. विद्युतभारीत खांबांना ट्रक आदळल्याने व विजेच्या तारा तुटल्याने या भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. मंगळवारी सकाळपासून हेस्कॉमच्या कर्मचाऱयांनी मोडलेले खांब व तारा जोडण्यात संपूर्ण दिवस घालविला. परिणामी विजेवर अवलंबून असणाऱया अनेक व्यावसायिक आणि घरगुती कामामध्ये संपूर्ण दिवस व्यत्यय निर्माण झाला होता.
ट्रक चालकावर कारवाईची मागणी सदर ट्रक चालकावर योग्य ती कारवाई करून दंड ठोठावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बेजबाबदारपणे ट्रक चालविल्यामुळे नागरिकांना वीजपुरवठय़ापासून वंचित रहावे लागले. तसेच शासनाच्या वस्तूंची झालेली मोडतोड यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.