सीबीआय प्रमुखाची निवड- पंतप्रधानांसोबत सरन्यायाधीशांची बैठक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सीबीआयच्या नव्या संचालकाच्या नियुक्तीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समितीने सोमवारी चर्चा केली आहे. या बैठकीत सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी एका नियमाचा उल्लेख केल्याने सरकारकडून शॉर्टलिस्ट करण्यात आलेली दोन नावे पदाच्या शर्यतीतून बाहेर पडली आहेत.
सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा उल्लेख करत 6 महिन्यांपेक्षा कमी कार्यकाळ शिल्लक राहिलेल्या अधिकाऱयांना पोलीस प्रमुखसारखे पद दिले जाऊ नये, असे म्हटले. समितीने नियमांच्या आधारावरच कुठल्याही नावावर विचार करावा असे सरन्यायाधीशांनी म्हटल्याचे समजते.
बीएसएफ महासंचालक राकेश अस्थाना यांचे नाव या पदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्याचे समजते. अस्थाना 31 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत. तर एनआयए प्रमुख वाय. सी. मोदी 31 मे रोजी निवृत्त होणार आहेत.
नवे संचालक म्हणून सीआयएसएफचे महासंचालक सुबोध कुमार जायसवाल, एसएसबीचे महासंचालक कुमार राजेश चंद्रा आणि केंद्रीय गृह मंत्रालयातील विशेष सचिव व्ही. एस. के. कौमुदी यांची नावे आता शर्यतीत उरली आहेत. जायसवाल 1985 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असून यापूर्वी त्यांनी महाराष्ट्रात पोलीस महासंचालक म्हणून काम पाहिले आहे.
चंद्रा हे 1985 च्या तुकडीचे आयपीएस असून बिहार कॅडरचे अधिकारी आहेत. सध्या ते एसएसबीचे महासंचालक आहेत. तर कौमुदी 1986 च्या तुकडीचे आंध्रप्रदेश कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत.
सद्यकाळात 1988 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आणि सीबीआयचे अतिरिक्त संचालक प्रविण सिन्हा सीबीआय संचालकाचा प्रभार सांभाळत आहेत. सिन्हा यांना हा प्रभार ऋषि कुमार शुक्ला यांच्या निवृत्तीनंतर सोपविण्यात आला होता. शुक्ला हे दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यावर फेब्रुवारीत सेवानिवृत्त झाले होते.