प्रतिनिधी / कारवार
कोविड-19 नियमांचे काटेकोर पालन करीत कारवार तालुक्यातील कद्रा येथील महामाया देवीची यात्रा साजरी करण्याची सूचना करवार-अंकोलाच्या आमदार रुपाली नाईक यांनी केली. कारवार तालुक्यातील यात्रांच्या हंगामातील पहिली म्हणून ओळखली जाणारी सुप्रसिद्ध श्री महामायाची यात्रा आज आणि उद्या (दि. 18 आणि 19 रोजी) होत आहे. या यात्रेला अनेक वर्षांचा इतिहास आहे. कद्रापासून काही किलोमीटर अंतरावर जंगलात अत्यंत विलोभनीय वातावरणात श्री महामाया देवीचे मंदिर वसलेले आहे. मंदिराचा परिसर सह्याद्रीच्या उंचच उंच रांगांनी वेढलेला आहे. मंदिर घनदाट जंगलात वसले आहे. हे खरे असले तरी यात्रा मात्र कद्रा येथे साजरी केली जाते. नवसाला पावणारी देवी अशी श्रद्धाळूंची श्रद्धा असल्याने देवीचा नवस फेडण्यासाठी आणि साकडे घालण्यासाठी हजारो भाविक यात्रेवेळी कद्रा येथे दाखल होत असतात. यामध्ये कर्नाटकसह गोवा आणि महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश असतो.
अलीकडच्या काळात यात्रेच्या वैभवात प्रचंड वाढ
कद्रा येथील श्री महामायाची यात्रा गेल्या अनेक वर्षांपासून आपले महत्त्व टिकवून आहे. दोन-अडीच दशकांपूर्वी कद्रा येथे काळी नदीवर धरण बांधून जल विद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे. धरण आणि ऊर्जा प्रकल्पाच्या निमित्ताने कद्रा येथे दक्षिण भारतातील वेगवेगळ्या राज्यांतील हजारो कुटुंबे वास्तव्य करून आहेत. त्याच बरोबर कद्रापासून काही किलोमीटर अंतरावर कैगा अणुऊर्जा प्रकल्पातील कर्मचाऱयांची कॉलनी आहे. या कॉलनीतही संपूर्ण देशातील हजारो कुटुंबे वास्तव्यस आहेत. स्थानिक श्रद्धाळूंसह कद्रा आणि कैगा प्रकल्पात सेवा बजावणारे कर्मचारी या यात्रेत सहभागी होत असल्याने अलीकडच्या काळात यात्रेच्या वैभवात अधिकच भर पडली आहे.
पाहणी करून महत्त्वपूर्ण सूचना
आमदार रुपाली नाईक यांनी सोमवारी ज्या ठिकाणी यात्रा भरते त्या परिसराची पाहणी केली आणि काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. देवीच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी केवळ 40 श्रद्धाळूंना मुभा देण्याची सूचना केली. एकाच वेळी केवळ पाच-सहा श्रद्धाळूंना देवीचे दर्शन घेता येईल. फुले आणि फळांची विक्री करणाऱयांनी आपल्यामध्ये किमान 50 मीटरचे अंतर राखले पाहिजे. दहाहून अधिक श्रद्धाळू यात्रेच्या वेळी एकत्र वावरू शकणार नाहीत. स्वयंसेवकांची फौज उभारण्याची सूचनाही आमदार नाईक यांनी केली. यावेळी भाजप नेते गणपती उळवेकर, कारवारचे डीवायएसपी अरविंद कलगुज्जी व देवस्थान प्रशासकीय मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.