प्रतिनिधी/ बेळगाव
मराठा युवक संघातर्फे शिवजयंती साजरी
मराठा युवक संघाच्यावतीने शनिवारी मराठा युवक संघाच्या सांस्कृतिक भवन येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांचे कार्यदर्शी शंकरगौडा पाटील यांच्या हस्ते शिवपुतळय़ाचे पूजन करण्यात आले. लॉकडाऊनमुळे यंदा शिवजयंती उत्सव आपापल्या घरीच साजरी करावी, असे आवाहन शिवप्रेमींना त्यांनी यावेळे केले. बेळगावच्या शिवजयंतीप्रमाणे देशात अन्यत्र मोठय़ा प्रमाणात जयंती साजरी केली जात नसून यंदा लॉकडाऊनमुळे साधेपणाने हा सोहळा साजरा करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांनी केले. याप्रसंगी मराठा बँकेचे संचालक शिवाजीराव हंगिरगेकर, मारुती देवगेकर, शेखर हंडे, उद्योजक कन्नुभाई ठक्कर, श्रीकांत देसाई, दिनकर घोरपडे आदी उपस्थित होते. सचिव चंद्रकांत गुंडकल यांनी आभार मानले.
माळी गल्ली युवक मंडळ
माळी गल्ली येथील युवक मंडळातर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. मास्क आणि सुरक्षित अंतर ठेवून गल्लीतील महिलांनी पाळणा गायिला. यावेळी संजय रणसुबे आणि अभिषेक पोरवाल यांच्या हस्ते शिवपुतळय़ाचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी मेघन लंगरकांडे, भूषण हेब्बाळकर, गौरव कल्याणकर, मिलिंद बामणेकर, अभिजित लंगरकांडे, भाऊराव चौगुले, सचिन कदम, प्रभाकर बामणेकर, लक्ष्मण ठोकणेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
श्री एकदंत युवक मंडळ समर्थनगर
श्री एकदंत युवक मंडळ विनायक मार्ग, समर्थनगर मंडळाच्यावतीने सुरक्षित अंतर तसेच नियमांचे पालन करून आगळय़ा पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. कोव्हिड-19 चे निरीक्षक मारुती खामकर, सफाई कामगार संजय चव्हाण, नारायण कोलकार, दंडरगी, आशा कार्यकर्त्या सुनीता पाटील, बिम्स येथील डॉक्टर विश्वास, परिचारिका श्रीदेवी मडिमनी, राजश्री रजपूत, सिलिंडर वितरक पुंडलिक पाटील यांना मंडळाच्यावतीने मास्क, हातमोजे, सॅनिटायझर आणि मिठाई देऊन त्यांचा कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच त्यांच्याच हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे पूजन करण्यात आले.
मंडळाचे संतोष कणेरी, नागेश गावडे, श्रीधर तम्मनाचे, अजित पोळ, निर्मळ कणेरी, पवन देशपांडे, महेश चौगुले, प्रभाकर हलगेकर, परशराम बेकवाडकर, अशोक खवरे, अरुण गावडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
म. ए. समिती महिला आघाडी
म. ए. समिती महिला आघाडीच्यावतीने छत्रपती शिवाजी उद्यान येथील शिवपुतळय़ास पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. अध्यक्षा रेणू किल्लेकर, यांच्या हस्ते आरती व पूजन करण्यात आले. यावेळी अनुपमा कोकणे, भाग्यश्री जाधव, प्रिया कुडची, अर्चना देसाई यांच्यासह अन्य कार्यकर्त्या उपस्थित होत्या.