ईदच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे विविध सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
बकरी ईदनिमित्त प्राण्यांचा बळी दिला जातो, पण याकरिता शासनाकडून नियमावली जारी केली आहे. गोहत्या करू नये, तसेच खुलेआम व सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांचा बळी देऊ नये. वैद्यकीय चाचणी करून प्रमाणपत्र दिलेल्या प्राण्यांचा बळी देण्यात यावा, अशा सूचना महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी केल्या.
बुधवार दि. 21 रोजी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोहत्या बंदीबाबतची माहिती देण्यासाठी शहरातील मुस्लीम समाजातील प्रमुखांची बैठक बुधवारी महापालिकेत आयोजित केली होती. यावेळी गोहत्या बंदीची माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी दिली. राज्य शासन व जिल्हा प्रशासनाकडून विविध सूचना करण्यात आल्या असून या सूचनांनुसार सण साजरा करावा, असे सांगितले.
अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नसल्याने कोरोना नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे. सणाच्या वेळी सॅनिटायझर, मास्क वापरणे तसेच सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे. शासनाकडून जाहीर केलेल्या नियमावलींचे पालन करावे. सणानिमित्त प्राण्यांचा बळी दिला जातो. पण हा बळी देताना गोहत्या करू नये, केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आरोग्य अधिकाऱयांनी दिला.
आरोग्य विभागाकडून प्रमाणपत्र मिळालेल्या प्राण्यांचा बळी देणे बंधनकारक राहील. सार्वजनिक ठिकाणी व उघडय़ावर प्राण्यांचा बळी दिल्याचे निदर्शनास आल्यास पोलीस व महापालिकेच्यावतीने गुन्हा नेंदविला जाईल. रस्त्याशेजारी किंवा गटारीमध्ये कचरा टाकू नये. स्वच्छता कामगारांकडे कचरा देण्यात यावा. कचरा इतरत्र टाकल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा विविध सूचना महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी दिल्या.
कोरोना नियमावलीचे पालन करत प्रशासनाच्या सूचनेनुसार बकरी ईद साजरी करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन उपस्थित प्रमुखांच्यावतीने माजी नगरसेवक फयीम नाईकवाडी यांनी दिले. याप्रसंगी माजी नगरसेवक बाबुलाल मुजावर, मनपा पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंते हणमंत कलादगी, पर्यावरण साहाय्यक अभियंते आदिलखान पठाण, प्रवीण किल्लारी, स्वच्छता निरीक्षक व मशिदींचे प्रमुख व समाजातील नागरिक उपस्थित होते.