नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बँकेतून कर्ज घेतलेल्या ज्या ग्राहकांनी लॉकडाऊनदरम्यान नियमित ईएमआय (हप्ते) भरणाऱया ग्राहकांना ‘लोन मोरेटोरियम’ काळासाठी व्याज माफीच्या योजनेचा फायदा मिळण्यास सुरुवात झाली आहे. बँकांनी अशा ग्राहकांना कॅशबॅक देण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाऊनच्या काळात ज्यांनी मोरेटोरियम सुविधेचा लाभ घेतलेला नाही, त्यांना चक्रवाढ व्याज कॅशबॅकच्या स्वरुपात परत देण्यात येणार आहे.
दोन कोटी रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱया आणि कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनदरम्यान वेळेवर हफ्ता भरणाऱया ग्राहकांना कॅशबॅक देण्याचे केंद्र सरकारने मान्य केले होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मागील आठवडय़ात ही योजना 5 नोव्हेंबरपर्यंत लागू करावी, असे निर्देशही दिले होते. त्यानुसार आता बँकांकडून लॉकडाऊनदरम्यान लोन मोरेटोरियमचा लाभ न घेणाऱया ग्राहकांना रिफंड दिला जात आहे.
कोरोना महामारी आणि लॉकडाऊनदरम्यान रिझर्व्ह बँकेने मार्च 2020 मध्ये कर्जदारांना तात्पुरत्या स्वरुपात कर्जाचा हफ्ता किंवा पेडिट कार्डच्या रक्कमेची थकबाकी तीन महिने न भरण्यास सूट दिली होती. यानंतर हा कालावधी 31 ऑगस्ट 2020 पर्यंत वाढवण्यात आला होता. ‘कॅशबॅक’चा लाभ 1 मार्च ते 31 ऑगस्ट या कालावधीतील 184 दिवसांच्या सर्व कर्जावर मिळणार आहे. या योजनेमुळे ज्या लोकांनी मोरेटोरियमसाठी अर्ज केलेला नाही अशा लोकांना देखील फायदा होईल. यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर सुमारे 7,000 कोटी रुपयांचा ताण पडणार आहे.
लोन मोरेटोरियम प्रकरणी 18 नोव्हेंबरला सुनावणी सर्वोच्च न्यायालयात लोन मोरेटोरियम प्रकरणी होणारी सुनावणी आता 18 नोव्हेंबर रोजी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी झालेल्या सुनावणीवेळी याचिकाकर्त्याने लहान कर्जदारांना मदत केल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार, असे म्हणत केंद्र सरकार आणि आरबीआयचे आभार मानले.