ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
टोक्यो ऑलिम्पकिमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचे नाव उंचावणाऱया नीरज चोप्राची प्रकृती अस्वस्थ झाली आहे. नीरजला मागील दोन दिवसांपासून ताप असून घसा खवखवण्याचा त्रास होत आहे. पण त्यातच चांगली बाब म्हणजे त्याची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. नीरज सध्या घरीच आहे.
- डॉक्टरांनी दिला आराम करण्याचा सल्ला
डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. नुकतेच नीरजने ट्रक आणि फील्ड इव्हेंटमध्ये 121 वर्षांनंतर भारतासाठी सुवर्णपदक जिंकून ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला. शनिवारी नीरजने दुसऱया प्रयत्नात 87.58 मीटर अंतरावर भाला फेकत सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर भारतात परतल्यावर विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाला होता. त्यात त्याची दगदग झाली आणि अतितणावामुळे नीरजला ताप आला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये पदक पटकविण्यापुर्वी नीरज 16 व्या स्थानावर होता आणि पदक जिंकल्यानंतर नीरजने थेट दुसऱया क्रमांकवर झेप घेतली आहे.
पदक जिंकल्यावर निरजने स्वतःच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. सध्या ही भावना जगतोय, ती तुमचा पाठिंबा आणि आशिर्वादामुळे मी या पातळीपर्यंत पोहोचलो. यासाठी संपूर्ण भारताचे आणि भारताबाहेरील लोकांचे आभार मानतो, अशा भावना व्यक्त केल्या होत्या. त्याच्या या पोस्टला अर्ध्या तासात साडेपाच लाखांहून अधिक लाईक्स मिळाले होते.