प्रतिनिधी/ चिपळूण
मार्च महिन्यापासून उद्भवलेल्या कोरोनाच्या परिस्थितीत निराधार फाऊंडेशनच्या माध्यमातून विविधप्रकारचे काम करून प्रशासनाला सहकार्य करणारे सचिव नाझिम अफवारे कोरोना योद्धा ठरले असून त्यांचा नुकताच प्रशस्तीपत्रक देऊन जिल्हा प्रशासनाने सन्मान केला आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्या अध्यक्षतेखालील निराधार फाऊंडेशन गेली अनेक वर्षे तालुक्यातील सुमारे शंभर गरिबांना दरमहा जीवनावश्यक वस्तू देऊन मदतीचा हात देत आहे. वयोवृद्धांच्या आरोग्यासाठी आरोग्य शिबिरेही घेतली जात आहेत. असे असतानाच या फाऊंडेशनच्या माध्यमातून अफवारे यांनी मार्च महिन्यापासून उद्भवलेल्या कोरोनाच्या परिस्थितीत गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, शासनाच्या शिवभोजन केंद्रांवर मोफत जेवण मिळावे म्हणून आर्थिक सहाय्य, कोविड सेंटरमध्ये विविध साहित्यांचा पुरवठा तसेच मदरसा व अन्यठिकाणी कोविड सेंटर उभी राहण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.
त्यांनी केलेल्या या भरीव व मोलाच्या मदतीची दखल घेऊन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी त्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान केला आहे. त्याचे प्रशस्तीपत्र नुकतेच अफवारे यांना अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड़ यांच्याहस्ते देण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, पोलीस निरीक्षक सासणे आदी उपस्थित होते.