शिक्षक नेते दयानंद नाईक वृद्धेसाठी बनले देवदूत : स्वखर्चाने बांधून देणार घर : आज पायाभरणी
‘तरुण भारत’च्या वृत्ताची दखल
तेजस देसाई / दोडामार्ग:
आपल्या दैनंदिन जीवनात अनेक अडचणी, दुःखाचे डोंगर उभे राहतात. अनेक घटनांनी आपल्या मनावर मोठा आघात होतो. अशावेळी त्या खचलेल्याना पुन्हा उभे करण्यासाठी साक्षात परमेश्वर कुणाच्या ना कुणाच्या रुपात धावून येतो असेच काहीसे आवडे येथील लीलावती शांताराम नाईक या 66 वर्षे वृद्धेच्या बाबतीत घडले आहे. एकटय़ाने जीवन कंठणाऱया लीलावतीचे घर गतवर्षीच्या पावसाळय़ात कोसळले व तिच्यावर एकच आघात झाला होता. आधीच निराधार व त्यात डोक्यावरचे छप्पर गेल्याने खचलेल्या या वृद्धेच्या मदतीसाठी शिक्षक भारती संघटनेचे पदाधिकारी तथा शिक्षक नेते दयानंद सखाराम नाईक हे अक्षरशः देवदूतच्या रुपात धावून आले व त्यांनी या वृद्धेला घर बांधून देण्याचे अभिवचन दिले होते. त्याची पायाभरणी उद्या रविवारी होत आहे. ‘तरुण भारत’ ने मांडलेल्या या वृद्धेसमोरील अडचणीला अनुसरून नाईक यांनी संकल्प सोडलेल्या या नियोजित घराचा प्रवेश देखील नाईक यांच्या वाढदिनी म्हणजेच 22 मार्चला होणार आहे.
गतवर्षीच्या पावसाळय़ात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. नद्या, नाले तुडुंब भरून वाहिले होते. अनेक ठिकाणी शेतीबागायतींचे अतोनात नुकसान झाले. अनेकांची घरे – दारे कोसळली किंबहुना त्यात पाणी घुसले. आवाडे येथील लीलावती शांताराम नाईक हिच्यावर देखील अशाच प्रसंग उद्भवला. तीच्या पतीने मोठय़ा कष्टाने बांधलेले मातीचे घर पावसाळय़ात कोसळले होते. गावात मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणाऱया या वृद्धेच्या डोक्यावरील छतच जणू गेले होते. त्यामुळे तिच्यासमोर घराची…. निवाऱयाची मोठी समस्या उभी राहिली होती.
‘तरुण भारत’ने मांडली होती व्यथा
आधीच निराधार, त्यात घरची झालेली अशी ही अवस्था. त्यामुळे अक्षरशः दीनवाणी आशेने परमेश्वराच्या मदतीकडे डोळे लावून बसलेल्या या लीलावती नाईक हीची व्यथा ‘तरुण भारत’ ने मागील वर्षी 19 ऑगस्टच्या अंकात मांडली होती. तिची व्यथा… कळकळ तसेच तिला हव्या असणाऱया घराची आवश्यकता वाचून अनेकांनी आपला मदतीचा हात पुढे केला. त्यातील शिक्षक नेते दयानंद नाईक यांनी तर लीलावतीला थेट तिचे घरच उभे करून देण्याचा संकल्प सोडला होता. त्याच दरम्यान कोरोना, लॉकडाऊनचेही संकट उभे राहिल्याने काही किरकोळ अडचणी उभ्या राहिल्या होत्या. मात्र, आता त्या अडचणी पूर्ण झाल्या असून या वृद्धेला तिचे हक्काचे चार भिंतीचे छपराचे घर मिळणार आहे. श्री. नाईक यांच्या सोबतीला खानयाळे गावचे सरपंच विनायक शेटये, उद्योजक सुशांत वाडकर, बंटी टोपले, भाई सावंत, सामाजिक कार्यकर्ते दीपक गवस, महेंद्र नाईक यांनीही सहकार्य दर्शवीत, या घर बांधणीमध्ये खारीचा वाटा उचलला आहे.
आज पायाभरणी, तर गृहप्रवेश 22 मार्चला
साक्षात देवदूताप्रमाणे धावून आलेल्या दयानंद नाईक यांनी या वृद्धेसाठी घर बांधून देण्याचा जो संकल्प सोडला होता, त्याची पायाभरणी अर्थात घराचे भूमिपूजन उद्या, रविवारी सकाळी नाईक यांच्या हस्ते होणार आहे. अवघ्या दीड महिन्यात लीलावतीचे हे हक्काचे घर पूर्ण करून देऊन त्या घराचा गृहप्रवेश 22 मार्च रोजी होणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी नाईक यांचा जन्मदिवस आहे. आपल्या जन्मदिनी एका निराधार माऊलीच्या डोक्यावर छप्पर उभे करून देण्याचे भाग्य मला मिळाले आहे. यापेक्षा बहुमोल गोष्टीची मी कल्पनाच करू शकत नाही, अशी भावना नाईक यांनी व्यक्त केली.