प्रतिनिधी / सांगली
नववर्षाच्या स्वागतार्थ निर्धार फौंडेशनने मार्केट यार्ड समोरील आयलँडची स्वच्छता करून रंगरंगोटी केली आहे. यासाठी राकेश व सहकाऱ्यांनी स्वच्छता व सुशोभीकरण करून या आयलँडचे रुपडेच पालटले आहे. सलग ९७७ दिवस शहरातील विविध भागात स्वच्छता करणाऱ्या निर्धार फौंडेशनच्या सदस्यांनी मध्यरात्री मार्केट यार्ड समोरच्या आयलँडचे स्वच्छता व रंगरंगोटी करून सुशोभीकरण केले आहे. रंगरंगोटी केलेला हा आयलँड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
नववर्षाची सुरुवात पार्टी, मौजमजेने होत असते, हे चित्र नेहमीचंच आहे. परंतु मध्यरात्री मद्याच्या धुंदीमध्ये नववर्षाचे स्वागत करणाऱ्या तरुणांना चपराक देत निर्धारने हा उपक्रम राबविला. सांगली शहरातील मुख्य, पण परंतु दुर्लक्षित अशा मार्केट समोरील आयलँडची स्वच्छता करून त्यावर निर्धार टीमतर्फे जनजागृतीचे संदेश देखील लिहण्यात आले आहेत.
यावेळी श्रमदानासाठी निर्धार फौंडेशनचे संस्थापक राकेश दड्डणावर यांच्या पुढाकाराने अजिंक्य रोपळकर, मेहबुब सय्यद, प्रमोद भंडारे, सतिश कट्टीमनी, दिपक कोळी आदींसह सहकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.