मनपा पथकांचे वसुलीवर लक्ष ः निर्बंधांचा फज्जा ः नागरिक मोकाट
प्रतिनिधी/सांगली
कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून निर्बंध कडक केले आहेत. तरीही रस्ते, बाजारपेठांमधील गर्दी मात्र कायम होती. निर्बंधाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका अधिकारी, कर्मचाऱयांची पथके शहरात सातत्याने फिरत होती. मात्र गर्दीवर अंकुश ठेवण्याऐवजी त्यांचे सावज टिपण्याकडेच अधिक लक्ष होते. दिवसभरात चार दुकानांवर कारवाई करत 40 हजार रुपयांचा दंड महापालिकेच्या पथकांनी वसूल केला.
महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. कोरोना नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येतोय. मात्र `न्हाणीला बोळा अन दरवाजा मोकळा’ अशी गत या उपाययोजनांची झाली आहे. पदाधिकारी, नगरसेवकांनाही याचे सोयरसुतक राहिलेले नाही. प्रचारक फाईलच्या मागे लागला आहे. दरम्यान कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येत नसल्याने पुन्हा निर्बंध कडक करण्यात आले आहेत.
सांगली शहरात मात्र उलटेच चित्र पहायला मिळाले. कडक निर्बंध असतानाही बाजारपेठ, रस्त्यावरील गर्दी कायम होती. छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईसह अधिकृत भाजी मंडई सुरू असल्याने नागरिकांची खरेदीसाठी गर्दी कायम होती. मारुती रस्ता, हरभट रोड, कापड पेठ, गणपती पेठ या बाजारपेठांमध्ये व्यापारी अर्धे शटर उघडे करून दुकानासमोर उभे होते. त्यामुळे गर्दी वाढतच होती. अनेक ठिकाणी पानपट्टी, चहा टपऱया, बेकरी पदार्थांची दुकाने सुरू होती.
निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका अधिकारी, कर्मचायांची पथके नियुक्त करण्यात आली आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे कामही या पथकांकडे आहे. मात्र हे सगळे बाजूला ठेवत महापालिकेची पथके केवळ सावज शोधत फिरत होती. निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याऐवजी पथकांनी दंड वसुलीवर अधिक भर दिला होता. त्यामुळे कडक निर्बंधांचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. शहरातील प्रमुख रस्त्यावरही प्रचंड वर्दळ होती.
चार दुकानांवर कारवाई
महापालिकेच्या पथकांनी कारवाईचा धडाका उडवला आहे. निर्बंधाचे उल्लंघन करणाऱया दुकानावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला. दिवसभरात चार दुकानांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून प्रत्येकी दहा हजार रुपयांप्रमाणे 40 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.