नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणाऱया भारतीय महिला बॉक्सर एमसी मेरी कोमने प्रवासावरील निर्बंध टाळण्यासाठी इटलीला रवाना होण्याचा निर्णय घेतला. भारताचे ऑलिम्पिक-पात्र मुष्टियुद्ध पथक सध्या इटलीमध्येच प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षणानंतर सर्व मुष्टियोद्धे तेथूनच जपानला रवाना होतील.
कोरोनामुळे अराजक परिस्थिती असल्याने अनेक देशांनी भारताला ‘रेड लिस्ट’मध्ये समाविष्ट केले आहे आणि यामुळे भारतातून येणाऱया प्रवाशांवर अधिक निर्बंध लादले आहेत. त्या पार्श्वभूमीवर, सर्वच भारतीय ऍथलिट्सनी अन्य देशातून जपानमध्ये दाखल होण्यास प्राधान्य दिले आहे. यंदा टोकियो ऑलिम्पिकसाठी भारताचे 9 मुष्टियोद्धे पात्र ठरले असून त्यात 5 पुरुष व 4 महिला ऍथलिट्सचा समावेश आहे.
‘मी माझे प्लॅन बदलले आहेत. मी आता दिल्लीला पोहोचले आहे आणि इथून उद्या किंवा परवा इटलीला रवाना होत आहे. भारतातून प्रवास करणाऱया प्रवाशांवर अधिक निर्बंध आहेत. ते मला टाळायचे आहेत’, असे 38 वर्षीय मेरी कोम वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाली. मेरीसह तिचे खासगी प्रशिक्षक छोटे लाल यादव व फिजिओ देखील सोबत असणार आहेत.
जपानने भारतीय ऍथलिट व पदाधिकाऱयांना स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी 7 दिवस आधी कोरोना चाचणी करुन घेणे सक्तीचे केले आहे. आठवडाभर कोणाशीही संपर्कात येऊ नये, तसेच जपानमध्ये पोहोचल्यानंतर पहिले 3 दिवस कोणाशीही थेट संपर्क साधू नये, अशी आयोजकांची भारतीय पथकातील सर्व सदस्यांना सूचना आहे. भारतासह आणखी 10 देशांवर जपानने कडक निर्बंध लादले आहेत. मात्र, या 10 देशांव्यतिरिक्त अन्य ठिकाणांहून, तसेच इटलीसारख्या ट्रेनिंग बेसवरुन येणाऱया ऍथलिटवर असे कोणतेही निर्बंध नसतील, असे मार्गदर्शक सूचनावलीवरुन स्पष्ट आहे.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने यापूर्वी टोकियो आयोजन समितीशी संपर्क साधत भारतीय पथकावरील निर्बंध शिथिल करावेत, अशी विनंती केली. आयोजकांनी रवाना होण्यापूर्वी केल्या जाणाऱया चाचण्यांमध्ये कपात करणे शक्य नसल्याचे स्पष्ट सांगितले. मात्र, मेडिकल अपडेटस् ऑनलाईन भरण्याची परवानगी संमत केली.