ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
निर्भया प्रकरणातील दोषींना वेगवेगळी फाशी देण्याची मागणी करणाऱया केंद्र सरकारच्या याचिकेची सुनावणी 5 मार्च पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. आता या याचिकेवर 5 मार्चला सुनावणी होणार आहे. त्यामुळे निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा लांबण्याची शक्यता आहे.
दरम्यान, 2012 च्या निर्भयाच्या चारी दोषींसाठी दिल्लीच्या कोर्टाने नवे डेथ वॉरंट जारी केले होते. त्यानुसार, दोषींना तीन मार्चला फाशी होणार होती. आता दोषींना वेगवेगळी फाशी देण्याची मागणीच्या याचिकेवर ५ मार्चला सुनावणी होणार असल्याने दोषींची फाशी पुन्हा लांबणावर पडली आहे.
दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार दोषींना 3 मार्चला सकाळी सहा वाजता फाशी देण्यासाठी नवे डेथ वॉरंट जारी केलं आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी चार दोषी मुकेश कुमार सिंह, पवन गुप्ता, विनय कुमार शर्मा, अक्षय कुमार यांना फाशी देण्यासाठी वॉरंट जारी केलं आहे. हे तिसऱयांदा डेथ वॉरंट काढण्यात आले आहे.
आतापर्यंत दोन वेळा फाशी लांबणीवर पडली आहे. कोर्टाने याआधी दोन वेळा डेथ वॉरंट जारी केले होते.