ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
निर्भया प्रकरणातील दोषींना 1 फेब्रुवारीला फाशी देण्यात येणार आहे. फाशीसाठी आता अवघे काही तास उरले असतानाच फाशीला स्थगिती द्या, अशी विनंती स्थानिक न्यायालयाकडे दोषींनी केली आहे.
दोषी विनयकुमार शर्मा याची दयायाचिका राष्ट्रपतींसमोर प्रलंबित आहे. तसेच दोषींसमोर अजूनही आपली बाजूमांडण्यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध असल्याचा युक्तीवाद दोषींचे वकील ए. पी. सिंग यांनी न्यायालयासमोर केला. तर त्यांच्या फाशीच्या वॉरंटला स्थगिती मिळावी अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाकडे केली आहे.
दरम्यान, निर्भया प्रकरणातील दोषी विनयकुमार शर्मा याने बुधवारी सायंकाळी राष्ट्रपतींकडे दयायाचिका सादर केली होती. दया याचिकेवरील निकाल आल्यानंतर 14 दिवस दोषीला फाशी दिली जाऊ शकत नाही, असे कायदा सांगतो. त्यामुळे दोषींची फाशी टाळली जावी, असे ऍड. सिंग म्हणाले.