आकाशात वाढले भारताचे बळ – 1500 किमीचा मारक पल्ला
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
आकाशाच्या मार्गाने येणाऱया शत्रूला धडा शिकविण्यासाठी आता निर्भय क्रूज क्षेपणास्त्र लवकरच सज्ज होणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) बुधवारी या शक्तिशाली क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले आहे. यातील सर्वात विशेष बाब म्हणजे याचे बुस्टर इंजिन भारतातच तयार करण्यात आले आहे.
हे क्षेपणास्त्र 1500 किलोमीटर अंतरापर्यंतच्या शत्रूवर वार करण्यास सक्षम आहे. परीक्षणादरम्यान हे क्षेपणास्त्र 100 किलोमीटरचे अंतर आणि सुमारे 15 मिनिटे आकाशात राहिल्यावर खाली आले होते, तांत्रिक बिघाडामुळे हे घडल्याचे सांगण्यात येते. पण निर्भर क्षेपणास्त्राचे परीक्षण आंशिक स्वरुपात यशस्वी ठरले आहे.
निर्भय सब सोनिक क्रूज क्षेपणास्त्राला बुधवारी ओडिशाच्या चांदीपूर परीक्षण केंद्रातून सकाळी 9.55 मिनिटांवर डागण्यात आले होते. स्वदेशी इंजिनाचे परीक्षण यशस्वी ठरले आहे, पण डिलिव्हरी प्लॅटफॉर्ममध्ये काही तांत्रिक बिघाडामुळे क्षेपणास्त्र खाली आले, कंट्रोलरमध्ये त्रुटी निर्माण झाली असावी. पण इंजिनने स्वतःचे काम फत्ते केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. वायुदल आणि नौदलाच्या युजर ट्रायलपूर्वी याचे पुढील परीक्षण मिशन मोडमध्ये केले जाणार आहे.
यापूर्वी ऑक्टोबर 2020 मध्ये याचे परीक्षण अयशस्वी ठरले होते. तेव्हा हे क्षेपणास्त्र 8 मिनिटे आकाशात राहिल्यावर खाली आले होते. निर्भय क्षेपणास्त्राचा वेग 0.7 ते 0.9 मॅकपर्यंत आहे. म्हणजेच हे क्षेपणास्त्र हवेतून 111 किलोमीटर प्रतितासापेक्षा अधिक वेगाने अंतर कापू शकते. शत्रूच्या रडारला चकवा देण्यास हे क्षेपणास्त्र सक्षम आहे. निर्भय क्रूज क्षेपणास्त्र 1500 किलोमीटर अंतरापर्यंत 300 किलोग्रॅमची अस्त्रs वाहून नेऊ शकते. तसेच जमिनीवरून 50 मीटरपासून 4 किलोमीटरच्या उंचीपर्यंत झेपावू शकते. या क्षेपणास्त्राचा लक्ष्यभेद अचूक असून ते समुद्र, जमीन आणि मोबाइल लाँचरने डागले जाऊ शकते.