बराक ओबामांच्या काळात उपराष्ट्राध्यक्ष राहिलेल्या जो बिडेन यांनी ट्रम्प यांची झोप उडवली आहे असे आता दिसू लागले आहे. निवडणुका अमेरिकेतील असल्या तरी भारतात त्यामुळे अतिउत्सुकता निर्माण झाली आहे.
उद्या अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक आहे. जगातील सर्वात शक्तिशाली नेत्याचे पद म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद होय. या निवडणुकीत सध्याचे डोनाल्ड ट्रम्प परत निवडून आले तर जगातील सातवे आश्चर्य मानायला लागेल. कारण कोणत्याही परिस्थितीत ट्रम्प निवडणूक जिंकू शकत नाहीत आणि त्यांना पराभवाची नामुष्की सहन करण्याशिवाय दुसरे गत्यंतर नाही असे जाणकार मानतात. तेथील सर्व मतदार चाचण्यांमध्येदेखील ट्रम्प यांचे बारा वाजणार अशीच भाकिते आहेत. स्वत:ला मोठे भविष्यवेत्ते भासवणारे काहीजण मात्र ट्रम्प जिंकणार असे सांगत आहेत पण सध्यातरी ते रस्त्यावरील ‘पोपटवाले’ भासत आहेत.
77 वर्षांचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन हे ’झोपाळू’ आहेत आणि त्यांचे आपण कधीच तीन तेरा वाजवू अशा वल्गना आपल्या प्रतिस्पर्ध्यांबाबत ट्रम्प यांनी केल्या आहेत. पण प्रत्यक्षात मात्र बराक ओबामांच्या काळात उपराष्ट्राध्यक्ष राहिलेल्या बिडेन यांनी ट्रम्प यांची झोप उडवली आहे असे आता दिसू लागले आहे.
निवडणुका अमेरिकेतील असल्या तरी भारतात त्यामुळे अतिउत्सुकता निर्माण झाली आहे. साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्यूस्टन येथील मेळाव्यात ट्रम्प यांचा प्रचार केल्याने देशात आणि अमेरिकन नागरिक बनलेल्या पूर्वाश्रमीच्या भारतीयांमध्ये एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली नसती तरच नवल होते. ट्रम्प यांनीदेखील मार्च मध्ये भारताचा धावता दौरा करून या मतपेढीला आकृष्ट केले. पण ‘सौ सोनार की एक लोहार की’ या न्यायाप्रमाणे बिडेन यांनी भारतीय मुळाच्या कमला हॅरिस यांना आपला उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार बनवून ट्रम्प यांची हवाच काढून घेतली. आता हॅरिस या माझ्यानंतर राष्ट्राध्यक्ष होतील अशी हवा तयार करून अमेरिकन भारतीयांमध्ये बिडेन यांनी स्वतःची हवा तयार केली आहे.अतिशय धनाढय़ उद्यमी असलेले ट्रम्प हे एक भंपक प्रकरण आहे. तसे नसते तर स्वतःला एकीकडे नरेंद्र मोदींचा दोस्त म्हणवणाऱया अमेरिकेच्या या अध्यक्षाने भारतावर दुगाण्या झाडल्या नसत्या. भारतात कोरोनाचे बळी कमी आहेत कारण तेथील सरकार खरा आकडा जनतेपासून लपवून ठेवते असे तारे ट्रम्प यांनी तोडले आहेत. भारतातील हवा अतिशय खराब आहे असा दावा करून ट्रम्प यांनी भारत आणि चीन हे दोन्ही देश वाईट हवापाण्यामुळे बदनाम आहेत असे सांगितले आहे.
भीक नको पण कुत्रे आवर, असे सांगायची पाळी एकप्रकारे नवी दिल्लीवर आली आहे. ट्रम्प यांनी आपल्या बेताल वक्तव्याने अमेरिकेच्या बऱयाच मित्रराष्ट्रांना दुखावले आहे आणि त्याची त्यांना साधी जाणीवही नाही. ट्रम्प यांनी आपण भारताबरोबर आहोत हे दाखवण्यासाठी निवडणुकीपूर्वी दोन आठवडे अगोदर आपले परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री नवी दिल्लीला पाठवून एक संरक्षणविषयक महत्त्वपूर्ण करार केला आहे. चीनबरोबरील संघर्षात अमेरिका पूर्णपणे भारताच्या बाजूने उभा आहे असे जाहीर केले आहे. असा करार कितपत फायदेशीर होणार अथवा कसा हे येत्या काळात दिसणार आहे.
आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर असलेल्या पाकिस्तानला चीन आपल्या ओंजळीने दूध पाजून भारताविरुद्ध फुत्कार काढायला तयार करत आहे. चीन आणि पाकिस्तान हे शनी-मंगळ भारताच्या राशीला आले असताना अमेरिकेतील निवडणुका होत आहेत. कोरोनाच्या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या निवडणुकात ट्रम्प यांचे पारडे कमजोर झालेले आहे ते या महामारीमुळे. या साथीच्या रोगाचा पहिल्यापासून जोमाने प्रतिकार करण्याची पावले उचलण्याऐवजी ट्रम्प या महामारीची प्रथम थट्टा करत बसल्याने एक लाखाहून जास्त अमेरिकनांना जीव गमवावा लागला आहे.
युरोपमध्ये या महामारीची दुसरी लाट आता ब्रिटनसारख्या देशात पसरू लागल्याने घबराट पसरली आहे. अमेरिका आणि युरोप या महामारीने हैराण झाला असताना चीन मात्र आपल्याला काहीही इजा न झाल्याचे दाखवून त्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. या महामारीचा जिवाणू चीनने जगभर पसरवला असा ट्रम्प यांचा जाहीर आरोप आहे.
यावेळच्या अमेरिकन निवडणुकांना चीनच्या जगातील वाढत्या वर्चस्वाची आणि अमेरिकेच्या घटत असलेल्या ताकदीचीदेखील किनार आहे. ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ या वादग्रस्त धोरणांमुळे स्थानिक लोकांना कितपत फायदा झाला हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे जगातील अमेरिकेची पत मात्र घटली हे निर्विवाद. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अप्रत्यक्षपणे चीनला फार फायदा झाला. चीनशी टक्कर घेण्याच्या इराद्याने आपण कामाला लागलो आहोत असे ट्रम्प यांनी जाहीर केले खरे, पण त्या करता जगातील सर्व प्रगत राष्ट्रांना त्यांनी एकत्र घेतले नाही. याउलट अशा राष्ट्रांना त्यांनी नाराज केल्याने परिणाम उलटाच झाला. आता तर अशी स्थिती निर्माण झाली आहे की ट्रम्प यांच्या भंपकपणामुळे चीन आणि रशियाचा फायदा झाला आहे असे दिसत आहे. युरोपमधील जर्मनीसारखी राष्ट्रेही ट्रम्प यांच्या कोत्या राजकारणाला कंटाळली आहेत. अमेरिकेच्या निवडणुकीत कोणीही निवडून येवो त्याला भारताशी गोडीगुलाबीने घ्यावे लागेल. कारण चीनचा वाढता दरारा सामान्य अमेरिकन नागरिकाला आणि युरोपिअन नागरिकांना असह्य होऊ लागला आहे.
अशावेळी चीनच्या ‘अरे ला कारे’ म्हणू शकणारा भारताशिवाय दुसरा देश आशियात नाही. चीनच्या तुलनेत भारत आर्थिकदृष्टय़ा अतिशय दुबळा आहे हेही त्यांना कळून चुकले आहे. अमेरिका आणि चीनमधील शीतयुद्द वाढले तर त्याचे बरेवाईट परिणाम भारताला देखील सोसावे लागणार आहेत. पुढील राष्ट्रपती बिडेन असोत अथवा ट्रम्प, मोदी आणि भारताला त्यांना सध्यस्थितीत विसरता येणार नाही हे खरे. 2020 हे साऱया जगा करता एक निर्णायक वर्ष ठरणार आहे.
सुनील गाताडे