पेट्रोल 94 तर डिझेलची 86 कडे वाटचाल
प्रतिनिधी / बेळगाव
देशातील विविध राज्यांमधील निवडणुका संपताच पुन्हा एकदा पेट्रोल- डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे. मागील दोन दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ होऊ लागली आहे. बेळगाव शहरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 94 तर डिझेलचा दर 86 कडे वाटचाल करू लागला आहे. यामुळे आधीच कोरोनामुळे व्यवसाय, उद्योग ठप्प असताना आता इंधन दरवाढीचा तोटा सहन करावा लागत आहे.
निवडणुकीपर्यंत बेळगावमध्ये पेट्रोलचा दर 93.27 तर डिझेलचा दर 85.49 इतका होता. परंतु दोन दिवसांमध्ये पेट्रोल 31 तर डिझेल 38 पैशांनी वाढले आहे. महिन्याभरापूर्वी इंधनच्या दरात मोठी वाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या इंधनाच्या किंमतींमुळे ही दरवाढ करण्यात आली होती. पेट्रोलचा दर पहिल्यांदाच 94 कडे गेल्याने सर्वसामान्यांची परवड होऊ लागली. आज प्रत्येकाकडे वाहने असल्यामुळे पेट्रोल गरजेचेच आहे. येण्या-जाण्यास वाहने आवश्यक असल्याने आर्थिक फटका बसू लागला आहे.
बुधवारी बेळगाव शहरात 93.58 रुपयांनी पेट्रोल तर 85.87 रुपयांनी डिझेलची विक्री करण्यात येत होती. पुन्हा दरवाढ करण्यात येत असल्याने सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. कोरोनामुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती खालावलेली असताना इंधन दरवाढीची आवश्यकता काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.