चंदीगड / वृत्तसंस्था
बलात्कार आणि हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमची पॅरोलवरील सुट्टीमुळे तुरुंगातून सुटका झाली आहे. त्याला हरियाणातील रोहतकच्या सुनारिया तुरुंगात ठेवण्यात आले होते. पंजाबमधील निवडणुकीच्या 13 दिवस आधी राम रहीमची सुटका झाली आहे. गुरमीत राम रहीमच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर सुनारिया तुरुंगाबाहेर कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली होती. हरियाणा तुरुंग विभागाने सिरसा डेरा प्रमुख राम रहीमच्या 21 दिवसांच्या फर्लो (रजा) अर्जाला आधीच मंजुरी दिली होती. रोहतक आयुक्तांच्या स्वाक्षरीनंतर त्याला सोमवारी तुरुंगाबाहेर आणण्यात आले. तुरुंगातून सुटताच अनुयायांसमवेत त्याची थेट डेऱयात रवानगी करण्यात आल्याचे दिसून आले.
राम रहीमला ऑगस्ट 2017 मध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा सुनावली होती. त्यानंतर पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याकांड आणि रणजीत हत्या प्रकरणातही त्याला दोषी ठरवण्यात आले. तुरुंगाच्या नियमांनुसार, कोणताही कैदी पॅरोल किंवा सुट्टी घेऊ शकतो. कायदा आणि सुव्यवस्था किंवा अन्य हरकती पाहून शासन आणि जिल्हा प्रशासनाला या संबंधित निर्णय घ्यावा लागतो. अलीकडेच राम रहीमने तुरुंग प्रशासनाकडे 21 दिवसांची रजा मागितली होती. कारागृह प्रशासनाने शासनाकडे अर्ज पाठवला होता. यानंतर सोमवारी राम रहीमला सुट्टी मंजूर झाली आहे. सिरसा डेरा येथे राम रहीमला पोलिसांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. पंजाबमधील 23 जिल्हय़ांमध्ये 300 मोठे डेरे आहेत, जे राज्याच्या राजकारणात थेट सामील आहेत.
निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता
गुरमीत राम रहीमची सुटका ही एक महत्त्वाची घटना मानली जात आहे. पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. पंजाबमधील अनेक विधानसभा जागांवर डेरा सिरसाचा प्रभाव आहे. डेरा सच्चा सौदा हरियाणातील सिरसा जिल्हय़ात आहे. पंजाबमधील माझा, माळवा आणि दोआबा भागातही या डेरांचे वर्चस्व आहे. याचा लाभ निवडणुकीत होण्याचा अंदाज विश्लेषकांकडून वर्तवला जात आहे. पंजाबमधील मालवा भागातील सुमारे 69 जागांवर त्याचा परिणाम होऊ शकतो अशी चर्चा आहे.