मतदान प्रक्रियेसाठी शासकीय यंत्रणेची तयारी : कर्मचारी कामात व्यस्त
प्रतिनिधी / बेळगाव
लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरणा प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. त्याचप्रमाणे मतदान प्रक्रियेसाठी शासकीय यंत्रणादेखील तयारीत गुंतली आहे. जिल्हय़ातील 8 मतदार संघात बॅलेट मशीन वितरणाचे काम एपीएमसी येथे शुक्रवारी करण्यात आले. त्यामुळे महापालिकेसह जिल्हय़ातील सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचारी या कामात व्यस्त होते.
जिल्हय़ातील 8 विधानसभा मतदार संघातील मतदारांचा समावेश लोकसभा मतदार संघात आहे. त्यामुळे प्रत्येक मतदार संघात बॅलेट मशीन पाठविण्याची व्यवस्था एपीएमसी येथे करण्यात आली होती. याठिकाणी गोडाऊनमध्ये काही मशीन ठेवण्यात आल्या होत्या. तसेच काही बॅलेट मशीन राज्यातील अन्य भागातून मागविण्यात आल्या होत्या या सर्व मशीन एपीएमसी येथील भाजीमार्केटच्या तळघरात ठेवल्या होत्या. प्रत्येक मतदार संघस्तरीय साहाय्यक निवडणूक अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या देखरेखीखाली असलेल्या स्ट्राँगरूममध्ये बॅलेट मशीन सोपविण्यात आल्या. या ठिकाणी आठही मतदार संघातील अधिकारी आणि कर्मचारी शुक्रवारी सकाळपासून या कामात गुंतले होते. प्रत्येक बुथस्तरीय बॅलेट मशीनची माहिती घेऊन त्यानुसार प्रत्येक विभागात ही यंत्रोपकरणे पाठविण्यात आली. त्यामुळे एपीएमसीमधील भाजीमार्केट आवारात बॅरिकेड्स लावून प्रवेश बंद करण्यात आले होते. बेळगाव महापालिका व्याप्तीत दोन मतदार संघ असल्याने महापालिकेची सर्व यंत्रणा या कामी व्यस्त होती. दोन्ही मतदार संघाचे स्ट्राँगरूम बी. के. मॉडेल येथे करण्यात आले आहेत. ग्रामीण मतदार संघाचे स्ट्रॉंगरुम वनिता विद्यालय येथे आहे. त्यामुळे एपीएमसीमधून बॅलेट मशीन त्या ठिकाणी पाठविण्यात आल्या. त्या ठिकाणी मतदानासाठी पिसायडिंग अधिकाऱयांकडे सोपविण्यात येतात.