निवडणूक काळात कडेकोट पोलीस बंदोबस्त
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. जिल्हा प्रशासनाने सर्व ती तयारी पूर्ण केली आहे. निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्याबाबतही नियोजन करण्यात आले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मंगळवारी संवेदनशील भागातून पथसंचलन केले.
बेळगाव महापालिकेची निवडणूक मोठय़ा चुरशीने पार पडते. कोरोनाकाळात ही निवडणूक होत असल्याने नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. त्यादृष्टिने जिल्हा प्रशासनाने प्रत्येक उमेदवाराला नियम घालून दिले आहेत. कोरोना मार्गसुचीचे पालन करत प्रत्येकाने निवडणूक लढवावी. याचबरोबर मतदारांनीही काळजीपूर्वक नियमांचे पालन करत मतदान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
एकूण 58 वार्डांसाठी ही निवडणूक होत असून यामध्ये 500 हून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मतदान केंद्रांची यादीही प्रसिद्ध झाली आहे. प्रत्येक मतदान केंद्र तसेच परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने नियोजन केले आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांत पोलिसांनी पथसंचलन केले.