सुवेंदु अधिकारी यांच्यानंतर रविंद्रनाथ भट्टाचार्य बाहेर पडणार
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱया विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सातत्याने झटके बसत आहेत. सिंगूर आंदोलनामध्ये ममतातांसोबत राहिलेले रविंद्रनाथ भट्टाचार्य यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे. तर एक दिवसापूर्वी नंदीग्राम आंदोलनातील सहकारी सुवेंदु अधिकारी यांनीही तृणमूलला रामराम ठोकला आहे.
रविंद्रनाथ भटट्चार्य यांनी टाटांच्या नॅनो प्रकल्पाच्या विरोधात तृणमूल काँग्रेसच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी तृणमूल नेते महादेव दास यांना पक्षातून हाकलले होते. दास हे भट्टाचार्य यांचे घनिष्ठ सहकारी मानले जातात.
तृणमूलचे वरिष्ठ नेते सुवेंदु अधिकारी यांच्या नाराजीदरम्यान निवडणूक व्यूहनीतिकार प्रशांत किशोर यांनी त्यांच्या घरी जात त्यांचे वडील व पक्षाचे खासदार शिशिर अधिकारी यांची भेट घेतली आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत खराब कामगिरीनंतर तृणमूलने किशोर यांच्याकडे निवडणूक व्युहनीती आखण्याची जबाबदारी सोपविली आहे.
तृणमूलवर टीकास्त्र
सुवेंदु अधिकारी मागील काही महिन्यांपासून तृणमूल काँग्रेस व राज्य सरकारच्या बैठकांपासून दूर राहिले आहेत. अधिकारी पूर्व मिदनापूर जिल्हय़ात सभा घेत असून यात ते पक्ष तसेच ममता बॅनर्जी यांच्या पोस्टरांचा वापर करणे टाळत आहेत. सुवेंदु यांनी अप्रत्यक्षपणे तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका चालविली आहे. तृणमूलच्या नेत्यांनीही याला प्रत्युत्तर दिले आहे.