डबल इंजिन सरकारच्या बाता केवळ निवडणूकीपुरत्या : केंद्रात व राज्यात सरकार असतानाही पेट्रोलचे दर चढतेच..
प्रतिनिधी /फोंडा
गोवा राज्यात सद्या विधानसभा निवडणूका जाहीर झाल्यापासून पेट्रोल इंधनचे दर नव्वदीत स्थिरावलेले आहे. शंभरीकडे हात टेकवल्यानंतर निवडणूकीच्या धामधुमीत सद्या दर स्थिर राहिल्यामुळे वाहनचालकांनी तात्पुरता सुस्कारा सोडला आहे. इतिहासात पहिल्यांदा पेट्रोल दर शंभरीकडे झुकले व त्यानंतर परत नव्वदीमध्ये घुसमटत आहे. कोरोनामुळे वाहन रॅली व मोठया जमावासह प्रचार मोहीम होणे शक्य नसल्याने उमेदवारांचे पेट्रोलचा भार थोडा कमी होणार असल्याने दिलासा मिळालेला आहे.
ऐन कोरोनाच्या संकटात नोकरी गमावलेल्या व अर्ध्या पगारावर गुजारणा करणाऱया सामान्य गोमंतकीयांवर पेट्रोल दरवाढीसह महगाईचा भडका हे दुहेरी संकट राज्यात होते. सरकारचा हेतू हा पेट्रोल इंधनावरील वाहनांनी वीजेवरील (इलेक्ट्रीक वाहने) वाहनांचा अवलंब करावा असावा असा कयास काही सुज्ञ नागरीकही लावत आहे.
फोंडय़ात- पेट्रोल 96.03 रूपये आणि डिझेल 86.94 रूपये प्रतिलिटर
माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत क्रांतीकारक निर्णय घेत गोव्यात इतर राज्यापैकी सुमारे रू 18 रूपये प्रति लिटर कमी दरात पेट्रोल उपलब्ध करून घडविलेले ते दिवस आता इतिहासजमा झाले आहेत. पेट्रोल दरवाढ कमी करून सामान्य जनतेला दिलासा दिला होता. मात्र सद्या डबल इंजिनचे स्वप्ने दाखविणारे सरकार याच पक्षाचे सरकार केंद्रात व राज्यात सत्तेवर असताना इंधनाचा दर वाढत चाललेला आहे याचे कारण देणे टाळते. सद्या फोंडय़ात आजच्या घडीला पेट्रोलचे दर रू. 96.03 पैसे प्रति लिटर असून डिझेलचा दर रू.86.94 पैसे प्रति लिटर असा आहे. विधानसभा निवडणूकीचा मोसम संपला की पेट्रोल दर परत शंभरीपार होत गगनाला भिडण्याची शक्यता सर्व वाहनचालक वर्तवित आहे. आजच्या बजेटमध्येही पेट्रोल दरवाढ हमखास राहील अशी चिन्हे दिसत आहेत.