पालिका वार्ड आरक्षण, पुनर्रचनाप्रकरणी न्यायालयाने ओढले होते ताशेरे
प्रतिनिधी / पणजी
गोव्यातील पाच पालिकांच्या निवडणुकीत वॉर्ड राखीवता व पुनर्रचनाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढून ठपका ठेवल्यानंतर राज्य निवडणूक आयुक्त चोखाराम गर्ग यांनी राजीनामा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आयोगाच्या कारभारावर टीका केली होती व पालिका निवडणूक अधिसूचनेला स्थगिती दिली होती. विरोधी पक्षांनी देखील त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या सर्वांचा परिणाम म्हणून त्यांच्यावर अखेर राजीनामा देण्याची पाळी आली आहे.
निवडणूक आयुक्त असलेले गर्ग यांच्याकडे कायदा सचिवपदाचा ताबा आहे. त्यांनी पालिका प्रशासन संचालकांना पत्र पाठवून पालिका वॉर्डांचे आरक्षण लवकर करण्यास लावले व पत्रही दिले. पालिका प्रशासनाने गर्ग यांच्या सांगण्यावरुन घाई – गडबडीत वॉर्ड आरक्षण तयार केले आणि ते जाहीर करुन मोकळे झाले. शिवाय आयोगाने व आयुक्तांनी सकाळी 10 वा. पत्रकार परिषद घेऊन निवडणुका जाहीर केल्या. त्याच दिवशी गोवा खंडपीठात वॉर्ड राखीवता प्रकरण यायचे होते आणि निवाडा व्हायचा होता. म्हणून आयोगाचा निवाडा होण्यापूर्वीच घाईने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला, परंतु तो शेवटी त्यांच्या अंगलट आल्याचे स्पष्ट झाले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिला होता आदेश
घटनेनुसार राज्य निवडणूक आयुक्त पदावर स्वतंत्र व पूर्णवेळ अधिकारी नेमण्याची गरज आहे. ते बंधनकारक आहे. त्यास कोणताही अतिरिक्त ताबा देता येत नाही. परंतु गोव्यात सरकारने त्यांना कायदा सचिवपदाचा अतिरिक्त ताबा दिला होता. यावर सर्वोच्च न्यायालयाने बोट ठेवून स्वतंत्र आयुक्त नेमण्याची शिफारस निवाडय़ातून केली होती. सर्व राज्यांनी त्याचा अवलंब करावा, अशी सूचना न्यायालयाने केली होती. त्याचा आदर करुन गर्ग हे निवडणूक आयुक्त पदावरुन पायउतार झाले आहेत. दरम्यान, माजी मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती यांच्या नावाची त्या आयुक्तपदासाठी चर्चा सुरु झाली आहे. आपल्याकडे तसा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. पण जर प्रस्ताव आला आणि जबाबदारी दिली तर ती स्वीकारण्याची तयारी नावती यांनी दर्शविली आहे.
राज्य निवडणूक आयुक्तपदी नारायण नावती यांची नियुक्ती
राज्य निवडणूक आयुक्तपदी अखेर नारायण नावती यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या नावास मान्यता दिली आहे. सरकारी आदेश जारी झाल्यानंतर आज सोमवारी सायंकाळपार्यंत ते या पदाचा ताबा घेतील असा अदांज आहे. नावती यांनी यापुर्वी अनेक वर्षे भारतीय निवडणूक आयोगाच्या गोव्यातील संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पाहिलेली आहे. त्यांच्या कारकिर्दीत विधानसभेच्या दोन व लोकासभेच्या दोन निवडणुका झाल्या होत्या. माहिती संचालक पदावरुन ते दोन वर्षांपुर्वीच गोवा सरकारच्या सेवेतून निवृत्त झाले होते. भारत सरकारतर्फे श्रीलंकेतील निवडणुकीदरम्यान भारतीय निवडणूक अधिकारी म्हणून त्यांची तेथे निवड झाली होती.