रोख रकमेसह दारुसाठय़ाचा समावेश – आतापर्यंतचा विक्रमी ऐवज सापडल्याची निवडणूक आयोगाची माहिती
मागील महिन्यात सुरू झालेल्या विधानसभा निवडणूक आचारसंहिता काळापासून आतापर्यंत 1 हजार कोटीहून अधिकचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिली. या ऐवजामध्ये रोख रक्कम, दारुसाठा आणि अन्य आमिष दाखविण्यात आलेल्या वस्तूंचा समावेश आहे. तामिळनाडूमध्ये सर्वाधिक 236 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या दाव्यानुसार 2016 नंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकांमधील कारवाईमध्ये सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपैकी चार राज्यांची निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. तर पश्चिम बंगालमध्ये अजूनही चार टप्पे बाकी असून एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे. पाच राज्यांबरोबरच काही राज्यांमध्ये पोटनिवडणुका होत असून तेथेही मोठय़ा प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आल्याचे प्रकार उघड झाले आहेत. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या प्रेसनोटमध्ये यासंबंधीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. कडक नियम आणि कडेकोट तपासणीमुळे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात कारवाई झाल्याचे आढळून आले आहे.
तामिळनाडू- तामिळनाडूमध्ये 446 कोटी 28 लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यात तब्बल 236 कोटी 69 लाखांची रोकड, 5 कोटी 27 लाखांची दारु, 2 कोटी 22 लाखांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत राज्यात 130 कोटी 99 लाखांची मालमत्ता जप्त केली होती.
पश्चिम बंगाल- पश्चिम बंगालमधील निवडणुकीदरम्यान आतापर्यंत एकूण 300 कोटी 11 लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यात 50 कोटी 71 लाखांची रोकड, 30 कोटी 11 लाखांची दारु, 118 कोटी 83 लाखांचे अमली पदार्थ समाविष्ट आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत बंगालमध्ये 44 कोटी 33 लाखांच्या जप्तीची कारवाई झाली होती.
आसाम- आसाममध्ये एकूण 122 कोटी 35 लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये 27 कोटी 9 हजारांची रोकड तर 41 कोटी 97 लाखांची दारु तर 34.41 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. तसेच 15 कोटी 18 लाखांच्या भेटवस्तू आणि 3.69 कोटींच्या अन्य वस्तूंचा समावेश आहे. मागील विधानसभा निवडणुकीत 16 कोटी 58 लाखांची मालमत्ता जप्त केली होती.
केरळ – येथे 84.91 कोटींची मालमत्ता जप्त केली असून त्यात 22 कोटी 88 लाखांची रोख रक्कम, 5 कोटी 16 लाखांची दारु आणि 4 कोटी 6 लाखांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत केरळमध्ये एकूण 26 कोटी 13 लाखांची मालमत्ता जप्त केली होती.
पुदुच्चेरी- येथे निवडणूक काळात एकूण 36.95 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. यात 5 कोटी 52 लाखांची रोकड, 70 लाखांची दारु, 25 लाखांच्या ड्रग्जचा समावेश आहे. मागील विधानसभा निवडणुकीत पुदुच्चेरीमध्ये 7 कोटी 74 लाखांची मालमत्ता जप्त केली.