बेळगाव / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक दिवसेंदिवस चुरशीची होताना दिसत आहे. भाजप आघाडी सत्ता राखणार की महाविकास आघाडी आपली सत्ता निर्माण करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक जरी कोल्हापुरात होत असली तरी तिची खलबतं मात्र बेळगावात सुरू आहेत.
बुधवारी एका हॉटेलमध्ये विकास आघाडीचे नेते व जिल्हा परिषदेतील सदस्य उपस्थित होते. आमचं ठरलंय हा पॅटर्न कोल्हापुरातून सुरू झाला आणि आज महाराष्ट्रात विकास आघाडीचे सरकार आले आहे. याचीच पुनरावृत्ती कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये करण्यासाठी व महाडिक गटाला आसमान दाखविण्यासाठी महाविकास आघाडी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. यासाठी बुधवारी आपल्या सर्व सदस्यांना घेऊन महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी बेळगाव गाठले. टिळकवाडीमधील एका हॉटेलमध्ये या सर्व सदस्यांना ठेवण्यात आले होते. सदस्यांकडून कोणताही दगाफटका होऊ नये, याकरिता प्रत्येक सदस्याकडील मोबाईल काढून घेण्यात आला होता. हे सर्व सदस्य गुरुवारी सकाळी 9 वाजता कोल्हापूरला रवाना होणार आहेत. अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या दावेदाराची नावे गुरुवारी सकाळी जाहीर करण्यात येतील, असे नूतन मंत्री बंटी उर्फ सतेज पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जिल्हा परिषदेत सत्ता परिवर्तन होणारच आमच्याकडे 34 सदस्यांचे मॅजिक फिगर असल्याने महाविकास आघाडीची सत्ता येणार, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे जरी निवडणुका कोल्हापुरात असल्या तरी या निवडणुकीच्या संदर्भातील सर्व खलबते बेळगाव शहरात होत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीची अनेक नेते मंडळी बुधवारी बेळगावमध्ये दाखल झाली होती.
या बैठकीला कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक, मंत्री बंटी पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार सुजित मिणचेकर, के. पी. पाटील, उल्हास पाटील यांसह इतर सदस्य उपस्थित होते.