बेळगाव : बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर आता वृत्तपत्रांतून तसेच प्रसारमाध्यम आणि सोशल मीडियावर जातीने लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आणि त्यांच्या सूचनेनुसार याबाबतचा लेखाजोखा ठेवावा, अशी सक्त ताकीद जिल्हाधिकारी डॉ. हरिषकुमार यांनी अधिकाऱयांना केली आहे.
जाहिरातींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाकडून कक्ष तयार करण्यात आले आहेत. जिल्हा माहिती आणि प्रसारण कार्यालयात हे कक्ष तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱयांनी भेट देऊन अधिकाऱयांना सूचना केली आहे. ‘न्यूज हाऊस’ असे या कक्षाचे नाव ठेवण्यात आले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, निवडणुकीसंदर्भात कोणताही पक्ष किंवा उमेदवार टीव्ही, केबल टीव्ही, सोशल नेटवर्किंग, सिनेमा हॉल, एलईडी थिएटर्स, वाहनांवरून जाहिरातबाजी करत असेल तर त्याचा संग्रह करणे आवश्यक आहे. कोणतीही जाहिरात प्रसिद्ध करायची असेल तर त्यासाठी परवानगी घेणे गरजेचे आहे. जे परवानगी घेणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या सूचनांचे पालन करून जाहिरातबाजी करणे बंधनकारक आहे. लोकसभा पोटनिवडणूक ही निःपक्षपाती होणे गरजेचे असून त्यासाठी नियमांचे पालन करा, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी माहिती आणि प्रसारण विभागाचे जिल्हा उपसंचालक गुरुनाथ कडबूर, आचार संहिता नोडल अधिकारी निसार अहंमद, श्रीमती झेड. जी. सय्यद, विनायक वन्नूर, के. आर. कुलकर्णी, एम. एम. पाटील, जी. वाय. कावळी, के. एस. कागळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.